पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटक ह्या संघटनेच्या मुखपत्रांतून जोशींनी आपले बहुतेक सर्व लेखन केले. मुख्यतः ते चळवळीशी संबंधित अशा विषयांवर होते; त्या लेखनातून ते आपल्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना भेटत असत, आपली मते त्यांच्यापर्यंत पोचवत असत.
 शेतकरी संघटनेचा पुस्तक प्रकाशन विभाग असायला हवा, हादेखील कुळकर्णी-म्हात्रे या द्वयीचाच आग्रह होता व त्यांनीच तो विभाग सुरूही केला. शेतकऱ्याचा असूड- शतकाचा मजरा, चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (दोन भागांत), शेतकऱ्यांचा राजा शिवाजी, जातीयवादाचा भस्मासुर, खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने, स्वातंत्र्य का नासले? ही त्यांची जुनी पुस्तकेदेखील वाचनीय आहेत. त्यांतली काही बरीच छोटी आहेत, पण जोशींची वैचारिक मांडणी समजून घेण्याच्या दृष्टीने तीही महत्त्वाची वाटतात. ही पुस्तके म्हणजेही बव्हंशी पूर्वप्रकाशित लेखांचे संकलनच आहे.

 'साहित्यिक व्हावे असे एकेकाळी आपल्याला वाटत होते,' असे त्यांनी एका भाषणात म्हटले होते. संस्कत व मराठी साहित्याची त्यांची जाण सूक्ष्म होती; पण एकूण साहित्यविश्वाविषयी त्यांचे मत तसे कटूच होते.
 पहिली गोष्ट म्हणजे, ज्या शेतकऱ्यांबरोबर काम करण्यात त्यांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले त्या शेतकऱ्यांच्या करुण जीवनाचे खरेखुरे चित्रण त्यांना मराठी साहित्यात कुठेच आढळेना. ते लिहितात,

दरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी-बियाण्याची जमवाजमव, खर्चीसाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतील कारस्थाने आणि भानगडी, पाऊस येतो किंवा नाही याची चिंता, आल्याचा आनंद व येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यानंतर होणारा आनंद व बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागलेल्या घरातून निसटताना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वतःपुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड साधनसामग्री आहे. पण या सत्तर टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही.

खुरपताना, गवत कापताना, पिके काढताना, जात्यावर शेतकरी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे म्हटलेली गाणी माळरानातच विरून गेली. मोटेवर, नांगरावर बैलांच्या साक्षीने शेतकऱ्यांनी ढाळलेले दुःखाचे कढ तापलेल्या जमिनीतच जिरून गेले.

शेतकऱ्याची पिके लुटून नेलेल्या दरोडेखोर लुटारूंच्या तळावर गायली गेलेली उत्तान, उन्मत्त गाणी साहित्यात आली. मोठ्या लुटारूंनी दरबार भरवायला सुरुवात केल्यावर त्यांचे कौतुक करणाऱ्या भाट-शाहिरांची प्रतिभा गाजली. त्यांचे मनोरंजन

४३६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा