पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अमेरिकेतील सिॲटल शहरात भरलेल्या WTOच्या परिषदेत खुलीकरणाविरुद्ध स्वयंसेवी संस्थांनी जोरदार निदर्शने केली होती व त्यात भारतातीलही अनेक संस्था सहभागी झाल्याचे मूर यांनी बघितले होते. त्या पार्श्वभूमीवर जोशींसारख्या एका शेतकरीनेत्याने डंकेल प्रस्ताव, जनुकीय तंत्रज्ञान आणि एकूणच खुलीकरणाची प्रक्रिया यांना इतके समर्थन द्यावे हे अधिकच उठून दिसणारे होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा मार्च २००० मध्ये भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. इस्लाम ए. सिद्दिकी हे त्यांचे सल्लागारही होते. त्यांचा अधिकृत हुद्दा त्यावेळी Senior Trade Advisor, US Department of Agriculture हा होता. WTO बरोबर होत असलेल्या सर्व चर्चामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यांच्या सन्मानार्थ जोशी यांनी जागतिक कृषी मंचाच्या भारत शाखेतर्फे दिल्लीच्या अशोका हॉटेलात एक जेवण ठेवले होते व त्याला १६ देशांचे राजदूतही हजर होते. त्यांनीही जोशींच्या भूमिकेचा गौरव केला होता. WTO संबंधित बाबींचा जोशींचा अभ्यास दांडगा होता व त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चांत जोशींची चांगलीच छाप पडत असे. पुण्याचे मदन दिवाण हे साधारण १९९५ ते २००४ ह्या काळात जोशींच्या निकटच्या सहवासात होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोशींच्या ह्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप स्वागत झाले होते, भारतातही मनमोहन सिंग यांच्यासारख्यांना जोशीबद्दल कृतज्ञता होती आणि याचे एक द्योतक म्हणजे, २२ मे २००४ रोजी मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी जोशींना आपल्या घरी ब्रेकफास्टसाठी आमंत्रित केले होते. दिवाण हेही त्या प्रसंगी उपस्थित होते.
 इथे एक गोष्ट नमूद करायला हवी. पाश्चात्त्य देशांत शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी दिली जाते व त्याविरुद्ध भारताने आवाज उठवलाच पाहिजे, ह्याबद्दल जोशींच्या मनात शंका नव्हती व त्यांनी स्वतःही त्यावर जागतिक शेती मंचावरून टीकाही केली होती. पण असा विरोध परिणामकारकरीत्या करता यावा ह्यासाठीही भारताने WTOचे सदस्य बनणे आवश्यक होते. पुढे त्यांची ती भूमिका सगळ्यांनीच स्वीकारली, पण जोशी यांनी दिलेल्या अविरत समर्थनाचा कधीच गौरवपूर्ण उल्लेख होत नाही.
 आर्थिक उदारीकरणाचा जागतिक प्रवाह व त्यामुळे देशात होऊ घातलेले निदान धोरणात्मक पातळीवरचे बदल विचारात घेऊन अशा परिस्थितीत आपली व पर्यायाने शेतकरी संघटनेची वाटचाल काय असावी याचा जोशी पुन्हा एकदा विचार करू लागले. जुन्या प्रकारचे आंदोलन आणि प्रचलित निवडणुकांचे राजकारण या दोन्ही वाटा आता काहीशा खुंटल्यासारख्या झाल्या होत्या.
 जोशी स्वतः शेतकरी आंदोलनात पडले होते ते वयाची चाळीशी उलटल्यावर. आंदोलन करण्याचे अनेक फायदे असतात; ज्यांच्यावर अन्याय होत असतो त्यांच्यात आंदोलनातून एकजूट निर्माण होते, आंदोलनामुळे सरकारचे व समाजाचे लक्ष त्या अन्यायाकडे वेधले जाते, त्यातून संघटना बळकट होते, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळते, योग्य त्या जागी दडपण आणून

414 = अंगारवाटा...शोध शरद जोशींचा