पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कागदोपत्री लावणे केवळ अशक्य आहे.
 पण लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम एखाद्या वणव्यासारखा पसरला. जोशींना आपल्या वचनपूर्तीसाठी दीड हजारहून अधिक गावांना भेट द्यावी लागली. प्रत्येक गावात सगळ्या नवऱ्यांनी आपापल्या बायकोला दानपत्र द्यायचा कार्यक्रम सार्वजनिकरीत्या, ढोल-लेझीमच्या गजरात मिरवणुका काढून, गावभर रांगोळ्या घालून, रोषणाई करून थाटामाटात साजरा केला जात असे. स्त्रियांमध्ये तर अफाट उत्साह असायचाच, पण पुरुषांचा उत्साहदेखील तेवढाच असायचा. आपण योग्य ते केले, काहीतरी चांगले केले, इतक्या वर्षांच्या ऋणातून मोकळे झालो याचा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असे. नंतर तिथे होणाऱ्या सभेत जोशी स्वतः भाषण करत. आसपासच्या गावांतील शेतकरीही अशा सभांना हजर असत व त्यांनाही असे करायची प्रेरणा मिळे.

 जोशी लक्ष्मीमुक्ती उपक्रमाचा संबंध अतिशय प्रभावीपणे रामायणातील सीतेच्या कथेशी जोडत व लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाच्या यशाचे एक कारण कदाचित तेही होते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे समकालीन सामाजिक स्थितीचा परिणाम. त्या दिवसांत अयोध्येत राममंदिर उभारावे म्हणून मोठे आंदोलन देशात चालू होते. लक्ष्मीमुक्तीबद्दल बोलताना रामायणातीलच एका उपकथेचा संदर्भ जोशी देत व तो अतिशय समयोचित असे. निराधार झाल्यानंतर आयुष्यात सीतेला किती अडचणींना सामोरे जावे लागले, तिची किती दैना झाली हे ते सांगत. आपल्या घरच्या लक्ष्मीवर रामायणातल्या सीतेसारखी अशी अवस्था येऊ देऊ नका, तिच्या नावाने मालमत्तेचा योग्य तो वाटा आत्ताच द्या, हा त्यामागचा संदेश असायचा. शिवाय हे तुम्ही तिच्यावर केलेले उपकार नसून, उलट तिच्या अनेक वर्षे थकलेल्या कर्जाची आंशिक परतफेड आहे, हा तुमच्या स्वतःच्या ऋणमुक्तांचा क्षण आहे, हेही ते बजावून सांगत.
 अनेक अर्थांनी सीतेच्या जीवनातील कारुण्य हृदयस्पर्शी आहे. मुळात ती भूमिकन्या. तिचा जन्मही जमिनीतला आणि शेवटी जगाचा निरोप घेतानाही तिला धरतीमातेनेच पोटात घेतले. जनक राजाला जमीन नांगरताना लहानगी सीता सापडली होती. जनकाने तिला वाढवले, तिचे रामाबरोबर लग्न लावून दिले. पण राजसुखाऐवजी तिच्या नशिबी वनवास होता. तिने वनवासाला जावे असा दशरथाचा किंवा अन्य कोणाचाच आग्रह नव्हता, अयोध्येला राजवाड्यात ती राहू शकली असती. पण 'सहते चरामी'चे व्रत गांभीर्याने घेत आणि 'जिथे राम, तिथे सीता' म्हणत तीही रामाबरोबर चौदा वर्षे वनवासात गेली, रामाशी कमालीची एकनिष्ठ राहिली. पण वनवास संपल्यावरही तिला स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करावेच लागले. दुर्दैव म्हणजे तथाकथित रामराज्य सुरू झाल्यानंतरही शेवटी रामाने तिचा त्यागच केला. तिला पुन्हा वनवासात पाठवले. ती गर्भवती असतानाही. तिची अन्य कुठली सोय करणे खरे तर रामाला सहज शक्य होते, पण तेही त्याने केले नाही. आपल्या पत्नीला न्याय देणे प्रत्यक्ष रामालाही जमले नाही. ह्या सगळ्यामागे रामाचीदेखील काही बाजू

३००अंगारवाटा... शोध शरद जोशींचा