पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याची साक्ष पटवणारा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. १९९८च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीला जाताना जोशींना अर्धांगवायूचा झटका आला. विमानतळावरून थेट रुग्णालयातच दाखल केले गेले. दाखल होऊन ४८ तास व्हायच्या आत नागपूरहून सरोज काशीकर, सुमन अगरवाल, शैलजा देशपांडे या रुग्णालयात येऊन त्यांच्याभोवती हजर झाल्या. पुण्याचे बद्रीनाथ देवकर व औरंगाबादचे हेमंत देशमुख हे दोघे त्यापूर्वीच हजर झाले होते. त्या दोघांनी तर येताना एक लाख रुपयेही बरोबर आणले होते. हॉस्पिटलमध्ये काही कमी पडायला नको म्हणून. दोघेही त्यावेळी तरी अगदी ओढगस्तीचा संसार करणारे; त्यांनी ऐनवेळी पैशाची जमवाजमव कशी केली त्यांचे त्यांना ठाऊक, नाशिकहून डॉ. श्याम अष्टेकरही पोचले. लातूरहून पाशा पटेल आले. या सगळ्यांना बातमी कशी पोचली आणि तडकाफडकी तेआपापले व्याप सोडून कसे निघू शकले कोण जाणे! जोशींचे थोरले बंधू बाळासाहेब दिल्लीलगतच फरीदाबाद येथे राहत असत; पण त्यांना बातमी लागून ते हॉस्पिटलमध्ये येईस्तोवर जोशींच्याभोवती लाल बिल्ला लावलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गराडाच पडला होता. बाळासाहेब हे कार्यकर्त्यांचे प्रेम बघून अगदी थक्कच झाले. आपल्या भावाला ते म्हणाले, "हे तुझं खरं कुटुंब. आम्ही रक्ताच्या नात्याचे; पण आम्हीसुद्धा इतक्या त्वरेने धावून आलो नाही."
  हीच भावना व्यक्त करताना त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई यांनी लिहिले आहे,

आम्हा भावाबहिणींपलीकडे शरदच्या कुटुंबाचा परीघ आता विस्तारला आहे. त्यात सर्व शेतकरी स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय येतात. माझ्या परिचयात सरोजताई, शैलाताई, मायाताई, शोभाताई अशा अनेक आहेत. माझ्यापेक्षा अधिक तत्परतेने त्या बहिणीची भूमिका पार पाडतात.


(चतुरंग, दैनंदिनी, २०१२, पृष्ठ ७६)


  जोशींना शेतकऱ्यांचे प्रचंड प्रेम मिळाले, पण त्यांना प्रथमपासून टीकाकारही खूप भेटले. त्याची त्यांना खंतही नव्हती. किंबहुना, 'आपल्यावर कोणी टीका करणारा भेटला नाही, तर आपल्या मांडणीत काहीतरी चूक झाली आहे असं खुशाल समजावं!' असे ते म्हणत. डावे विचारवंत, अर्थतज्ज्ञ, पत्रकार वगैरेंकडून होणाऱ्या टीकेबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ते कितपत बरोबर होते हे जो तो आपापल्या विशिष्ट भूमिकेनुसार ठरवेल.
 प्रथमपासून त्यांच्यावर सर्वाधिक टीका करणारे होते डावे विचारवंत. त्यांच्याविषयी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्याच दरम्यान जोशींनी लिहिले होते :

डाव्या कार्यकर्त्यांची परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे नाव घ्यावे, पण काम करावे कामगारांचे, पांढरपेशांचे. त्यांची मजुरी वाढवून द्यावी, बोनस मागावे, नोकरीतल्या इतर अटी सुधारून घ्याव्यात, महागाईला विरोध करावा हे कार्यक्रम त्यांनी वर्षानुवर्षे राबविले आणि गरिबांचे कैवारी म्हणून ते मिरवले.


३९६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा