पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिल्ह्यात घेऊन गेला. पुढे निरगुडे संघटनेचे अध्यक्षही बनले.
 अलिबागचे सुरेशचंद्र म्हात्रे आणि अरविंद वामन कुळकर्णी जोशींना प्रथम भेटले निपाणी आंदोलनात; ती पहिली भेटही अशीच संस्मरणीय झाली होती. "मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातले आहात; आम्हाला वाटलं हेलिकॉप्टरने याल!" अशा नर्मविनोदी शब्दांत जोशींनी केलेल्या सहजस्फूर्त स्वागतात वातावरणातला प्रचंड तणाव दूर करण्याचे आणि त्याचबरोबर दोन उत्तम लेखक-कार्यकर्ते कायमचे जोडण्याचे सामर्थ्य होते.
 मराठी विचारवंतांनी व साहित्यिकांनी जोशी यांची योग्य ती कदर केली नाही याची कुळकर्णांना कायम खंत असायची. माणूस मधल्या एका लेखात (१४ मार्च १९८१) ते लिहितात,

नेहमीच्या मराठी पद्धतीला जागून शरद जोशी यांची खिल्ली उडविण्याचे कर्म जवळजवळ सर्व मराठी पत्रकारितेने केले. भारतात सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक गळचेपी चव्हाट्यावर मांडावी, त्यांच्यासाठी न्याय मागावा हे अर्थशास्त्राला आजवर सुचले नाही. हे सारे छातीठोकपणे सांगणारा आणि नुसते आपल्या केबिनमध्ये बसून न सांगता त्यासाठी आवश्यक ती जागृती करणारा, संघटना उभारणारा, या क्षेत्रातील प्रस्थापितांची झोप उडवील असे रान उठवणारा शरद जोशी हा पहिला नि खराखुरा शेतकरी नेता आहे. आज कदाचित अतिशयोक्तीचा आरोप होईल; पण तो पत्करूनही असे म्हणावेसे वाटते, की दलितांना डॉ. आंबेडकरांच्या रूपाने जसा पहिल्यांदा सर्वार्थाने समर्थ नेता लाभला, तसाच या शरद जोशींच्या रूपाने आज शेतकऱ्यांना नेता लाभला आहे.

 दुर्दैवाने पुढे २९ ऑक्टोबर २००३ रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने कुळकर्णीचा बळी घेतला.
 शिरोळचे झुंजार आणि लोकप्रिय शेतकरीनेते राजू शेट्टी यांच्याविषयीही पहिल्या भेटीच्या संदर्भात इथे लिहायला हवे. जोशींपासून पुढे त्यांची वाट वेगळी झाली; त्यांनी वेगळी संघटना काढली आणि पक्षही. निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत कमी आर्थिक बळ असताना. पुढच्या गावी जाण्यासाठी गाडीत पेट्रोल भरायला मागच्या गावचे शेतकरी पैसे गोळा करत. निवडणुकीत लागणाऱ्या अमाप पैशाबद्दल सगळे बोलतात; पण त्यालाही काही अपवाद असतात हे राजू शेट्टी यांनी सिद्ध केले. त्यांनी लिहिले आहे,

माझे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर आई सोडून मी कोणाच्या कधी पाया पडलो नाही; अपवाद फक्त शरद जोशींचा. औरंगाबादला ते एकदा उपोषणाला बसले होते. सरकार लक्ष देत नव्हतं, म्हणून मी मोर्चा काढला. त्यांना ती बातमी कळल्यावर पंधरा दिवसांनी ते कोल्हापूरला आले. मोरेश्वर टेमुर्डेनी मला साहेबांच्या पुढे नेलं. 'हाच तो मुलगा' म्हणत भेट घालून दिली. 'एवढं धाडस करत जाऊ

३८०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा