पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अनेक तज्ज्ञ केवळ आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या प्रस्तावाला डोळे मिटून कसा विरोध करत आहेत, याविषयी त्या लेखात जोशींनी लिहिले होते.
 त्या लेखाच्या शेवटी जोशींनी लिखित शब्द मेला असे त्यांना का वाटते, हे दाखवणारा एक प्रसंग सांगितला होता. ते लिहितात,

माझ्या नात्यागोत्यातील कुटुंबांत माझ्या कामासंबंधी कौतुक तर सोडाच, पण जिज्ञासाही नाही. माझ्या उपस्थितीत शेती, शेतकरी आणि तत्संबंधी विषय कटाक्षाने टाळण्याचा शिष्टाचार सगळे जण पाळतात. कुटुंबातील एक दुःखद घटना म्हणून माझ्याकडे सगळे पाहतात. पण परवा एकदम बदल झाला. महाविद्यालयात जाणारी माझी एक भाची थोड्या दिवसांपूर्वी मला पाहिल्याबरोबर तिच्या शाळेत जाणाऱ्या भावाला म्हणाली, 'परवा (टीव्हीवर) 'परख'मध्ये पाहिले ना, ते हे अंकल! त्यांचा ऑटोग्राफ घे!' लिखित शब्दाचा यापेक्षा अधिक निश्चयात्मक मृत्युलेख काय असू शकेल?

 नात्यागोत्यातला हा अनुभव खरे तर अनेक लेखकांना आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही!
 पण ह्या अनुभवावरून जोशींनी काढलेला निष्कर्ष मात्र नक्कीच नाकारायला हवा! कारण लिखित शब्दाला भवितव्य नसते, तर जगातील सर्वांत कार्यमग्न माणूस ज्यांना म्हणता येईल, त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाच पुस्तके लिहिण्यासाठी आपल्या अत्यधिक व्यग्र दिनक्रमातून वेळ काढलाच नसता.
 किशोरवयातच जोशींना असे वाटे, की या सर्व अनंत जगामध्ये एक काहीतरी असे सूत्र असले पाहिजे, की ज्या सूत्रामुळे जगातील सारे बदल घडून येतात, साऱ्या क्रांत्या घडतात आणि अशा त्या सूत्राचा वेध घेणारे एक पुस्तक लिहावे, अशी त्यांची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. सगळ्या विश्वाचे रहस्य उलगडून दाखवणारे असे काहीतरी त्यांना लिहायचे होते.
 ते एकदा म्हणाले होते,
 "एखादा मोठा डोलारा उभा असावा पण त्याचा मूलाधार असलेली एखादी छोटीशी काडी हलवताच तो कोसळावा, या कल्पनेचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. मला लहानपणापासूनच असं वाटत आलं आहे, की जगातल्या सगळ्या घटनांना आधारभूत असा एखादा सिद्धांत आपण शोधला पाहिजे; असा सिद्धांत की ज्याद्वारे जगातील सगळ्या घटनांची संगती लावता येईल. मी एक मोठं पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्याचं शीर्षक होतं, Theory of Revolutions."
 पोस्टखात्यात नोकरीला असताना १९६७ मध्ये ते सात महिन्यांसाठी पॅरिसला प्रशिक्षणार्थ गेले होते व त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या इंग्रजीतील १६ हस्तलिखित पानांचा उल्लेख दुसऱ्या प्रकरणात आहे. ती पाने या संभाव्य पुस्तकाशी संबंधित असावीत असे वाटते,


४४६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा