पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायला हवा, तिच्यासारख्या परित्यक्त स्त्रियांना आसरा मिळेल, घराचा उंबरठा ओलांडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर ती उभी राहू शकेल असेही काही प्रशिक्षण देता येईल असे एखादे आश्रयस्थानवजा स्मारकही तिथे असायला हवे असेही जोशींना वाटले. तेव्हापासून शेतकरी महिला आघाडी व गावकरी प्रयत्नशील होते, पण आवश्यक तो निधी जमेना. अनेक वर्षे ते मंदिर भग्नावस्थेतच होते; सीता वनवासीच राहिली होती. पुढे जोशी राज्यसभेचे खासदार असताना आपल्या खासदार निधीतून त्यांनी दहा लाख रुपये सीता स्मारकासाठी दिले; मंदिरासाठी मात्र तो निधी वापरता येत नाही. त्यासाठी त्यांनी स्वतःची वेगळी तेरा लाखाची देणगी दिली, इतरही काही जणांनी मदत केली व शेवटी २ ऑक्टोबर २०१० रोजी पुनर्निर्मित मंदिराचा लोकार्पण समारंभ पार पडला.
 रावेरी गावचे एक मोठे शेतकरी बाळासाहेब देशमख, एमएसईबीमध्ये ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते. खरे म्हणजे ते नोकरी करत होते ती आस्थापना भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे, पण अशा ठिकाणी नोकरी करूनही त्यांनी आपला प्रामाणिकपणा कायम राखला. आता ते सेवानिवृत्त आहेत. शेतकरी संघटनेचे काम आपली नोकरी सांभाळून ते जवळजवळ तीस वर्षे करत आले आहेत. त्यांच्याच सहकार्याने प्रस्तुत लेखकाला ते सीतामंदिर बघता आले. तो सगळा परिसर त्यांनी स्वच्छ करून घेतला आहे. जिल्ह्याच्या पर्यटक नकाशावर सीतामंदिराची नोंद व्हावी व त्याद्वारे लांबलांबचे पर्यटकही इथे यावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. सुदैवाने काही स्थानिक कार्यकर्ते या कामात त्यांना साथ देत आहेत. स्मारकाची उभारणी शक्य तितक्या लौकर पूर्ण करायचा व पुढे त्याचा योग्य तसा वापर करायचा त्यांचा निर्धार आहे.
 लक्ष्मीमुक्ती हे नावही मोठे प्रतीकात्मक आणि सीतामंदिर हेही मोठे प्रतीकात्मक. पौराणिक प्रतीकांचा विधायक वापर केला तर तो चळवळीसाठी किती प्रभावी ठरतो याचेही लक्ष्मीमुक्ती ते सीतामंदिर हा प्रवास म्हणजे एक प्रतीक आहे.
पारंपरिक संकल्पनांचा प्रभावी वापर हे एक शेतकरी संघटनेचे मोठेच वैशिष्ट्य होते. ओंगळ देवता आणि मंगल देवता, विठोबाला साकडे, सीताशेती ही अशीच काही त्यांनी आधुनिक काळाचा योग्य तो संदर्भ देत वापरलेली पौराणिक प्रतीके.

 दुर्दैवाने या अभूतपूर्व अशा लक्ष्मीमुक्ती अभियानाचे नेमके स्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा शेतकरी संघटनेबाहेरच्या विचारवंतांनी वा कार्यकर्त्यांनी फारसा प्रयत्नही केला नाही. ज्या थोड्यांनी तो केला त्यांच्यातल्या काहींना सोबत घेऊन गेल ऑमवेट (Ombvet) आणि चेतना गाला यांनी २ ते ५ फेब्रुवारी १९९२ या काळात मेटीखेडा व रावेरी या दोन गावांची पाहणी केली. त्यांच्यासोबत असलेल्यांमध्ये त्यावेळी पुण्यात आलेल्या राज्यशास्त्राच्या अमेरिकन प्राध्यापिका डॉ. आयरिन डायमंड व त्यांचे पती, 'ग्रीन पार्टी'चे कार्यकर्ते जेफ लौंड, वंदना शिवा व इतर आठ-दहा मंडळी होती.

 त्याबद्दल शेतकरी संघटकमध्ये लिहिलेल्या आपल्या दोन लेखांत (२१ जून व ६ जुलै १९९२) जन्माने अमेरिकन असलेल्या पण भारतातील परिवर्तनाच्या कार्यात स्वतःला

किसानांच्या बाया आम्ही...३०३