पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भासली नाही; याचे कारण एक मूलभूत असे वेगळेपण हे असावे. 'योद्धा शेतकरी'मध्ये परुळकरांनी लिहिले आहे, की जाहीर सभेतही ते खूपदा व्यासपीठावर अगदी शांतपणे बसलेले असत, इतर सहकारी चर्चा करत असताना एकटेच शीळ घालत वा गाणे गुणगुणत असत; जणू आपण त्या गावचेच नाही. या अलिप्तपणामागेही ते मूलभूत वेगळेपण असू शकेल.
  म्हणूनच ते आपली आरक्षणाला विरोध आणि डंकेलला पाठिंबा, गोहत्याबंदीला विरोध आणि जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मॉडिफाइड) बियाणांना पाठिंबा असली 'पॉलिटिकली इनकरेक्ट' मते बिनधास्त व्यक्त करत राहिले; पाश्चात्त्य पोषाखातील कोणालाही भेटायला महेंद्रसिंग टिकैतना आवडत नाही हे ठाऊक असूनही जोशींनी त्यांना भेटताना जीन्सटीशर्ट हा आपला वेष बदलला नाही. सार्वजनिक जीवन जगतानाही त्यांच्या व्यक्तित्त्वाचा एक मोठा हिस्सा खोलवर कुठेतरी आत्ममग्नच राहिला, सामान्यांमध्ये वावरतानाही आपले डौलदार राजहंसी वेगळेपण जोशी जपत राहिले.

 त्यांच्या भाषणांत व लेखनात मागे वळून पाहताना होणाऱ्या अपेक्षाभंगाचा सूर कधीकधी व्यक्त झाला आहे. उदाहरणार्थ, श्रीरामपूर येथे १२ जानेवारी २००० रोजी त्यांनी दिलेले अण्णासाहेब शिदे स्मृती व्याख्यान. खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने या त्यांच्या पुस्तकात 'प्रचलित अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांचे भवितव्य' या शीर्षकाखाली ते प्रकाशित झाले आहे. त्या एकाच लेखात त्यांनी सहा वेळा स्वतःचा उल्लेख स्पेंट फोर्स (ज्याचे कार्य संपलेले आहे) असा केला आहे.
 त्यानंतर पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करताना ३० ऑगस्ट २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहुती सेनापतीची मंगल होवो तुला ह्या लेखात त्यांनी म्हटले आहे,

आयुष्याची गाडी बऱ्यापैकी उतरणीला लागल्यानंतर, उमेदीच्या वर्षांत काय घडले, काय झाले, काय केले, काय करायला हवे होते याचा विचार साहजिकच मनात डोकावून जातो. आजतरी मला येणाऱ्या उषःकालाची अंधूकही छटा पूर्वक्षितिजावर दिसत नाही. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या माणसांना लाथाडून देशभर फिरलो. त्यांचे शाप आपल्याला लागले की काय, अशी शंकाही मनात येऊन जाते. रूढार्थाने माझ्यासारख्या नास्तिकाला ही भावना उचित नाही. मानसिक संतुलन पहिल्यासारखे खंबीर राहिलेले नाही, मन विचलित झाले आहे याचे हे लक्षण आहे, हे मलाही मान्य आहे."


(बळीचे राज्य येणार आहे ... पृष्ठ १३४-५)


  पण एक मात्र स्पष्ट जाणवते; वेळोवेळी अपेक्षाभंग झाला तरीही, मनासारखे दान नियतीने कधीच पदरात टाकले नाही तरीही, त्यांचा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात भरून राहिलेला आत्मविश्वास त्यांना कधीही सोडून गेला नाही. गुंजाळ यांच्याशी झालेल्या एका पत्रव्यवहारात


४८८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा