पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांतले निदान काही इंग्रजीतही असायला हवे होते. मराठी भाषेच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर वाचले जावे असे त्यांच्याजवळ खूप काही होते.
 चळवळीच्या धामधुमीत त्यांच्या हातून फारसे लेखन झाले नाही हे समजण्यासारखे आहे. कारण शेवटी लेखकाला लेखन करतानातरी स्वतःला इतरांपासून तोडून घ्यावे लागते, बाकी सारे विसरून तासनतास लेखनसमाधीत रंगन जावे लागते, तरच त्या लेखनाला उत्कटता, एकतानता लाभते. त्यांच्या लेखनात जाणवणारा एकाग्रतेचा अभाव, आणि एक प्रकारचा विस्कळीतपणा हा त्या धकाधकीच्या जीवनातूनच आलेला असावा. आयुष्यातील शेवटची काही वर्षे जरी त्यांनी पूर्णवेळ लेखनाला दिली असती, तर काही उत्तम पुस्तके वाचकांना मिळाली असती. पण आवश्यक ते प्राधान्य जोशी लेखनाला देऊ शकले नाही. 'भारतातला शेतकरी कर्जमुक्त झालेला मला पाहायचा आहे' हाच ध्यास त्यांना शेवटपर्यंत होता, शेवटच्या काही वर्षांतही शेतकरी संघटनेचीच काळजी होती. प्रकृतीचीही फारशी साथ नव्हती हेही खरेच आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या अनेक शक्यता अमूर्तच राहिल्या.

 १९९१नंतर जेव्हा त्यांनी शेतकरीलढ्याचे पुढचे पाऊल म्हणून नव्या दिशांचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी आपले विचार फक्त शेतकरीवर्गापुरते न राहता सर्व समाजापढे येणे आवश्यक आहे ही जाणीव त्यांना झाली. नव्वदच्या दशकात बदलत्या परिस्थितीचा वेध घेताना त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर बरेच लेखन केले. या साऱ्यातून त्यांनी महत्त्वाचा असा वैचारिक वारसा भावी पिढ्यांसाठी मागे ठेवला आहे. त्या समृद्ध वारशातील काही घटक इथे नोंदवणे आवश्यक वाटते.
 एक तर पहिले संपत्तिनिर्माण हे शेतीतच झाले आणि त्यानंतरचा सगळा इतिहास हा शेतीतील ह्या संपत्तीची जी लूट होत गेली त्या लुटीचा इतिहास आहे हे त्यांचे प्रतिपादन. शेतकरी आंदोलनाचा ती मांडणी हा पायाच होता व त्याबद्दल नवव्या प्रकरणात विस्ताराने लिहिलेले आहे.
प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारे इतरही अनेक विचार जोशींनी मांडले. उदाहरणार्थ, ते म्हणतात की आर्थिक विकास ही गर्भाच्या वाढीप्रमाणे सहजतः होणारी बाब आहे; त्यात घिसाडघाई करता उपयोगी नाही. जीवशास्त्रीय विकासाप्रमाणेच आर्थिक विकास ही निसर्गतः होणारी गोष्ट आहे. त्यासाठी कोणालाही काहीही वेगळे करण्याची गरज नाही; जो तो त्याचा त्याचा विकास करतच असतो. आर्थिक विकास ही माणसाची निसर्गसिद्ध प्रेरणा आहे. लहान मुलाला मोठे करण्याकरिता त्याला आडवे-उभे असे काही ताणावे लागत नाही! गरिबी दूर करण्याच्या नावाखाली ती वाढवणारे तुमचे नियोजन बंद करा, लोक आपोआपच आपापला विकास साधतील. “गरिबाच्या छाताडावरून तुम्ही उठा, म्हणजे मग तो स्वतःच उभा राहील आणि आपली प्रगती करून घेईल," हे गांधीजींचे उद्गार जोशी अनेकदा उद्धृत करत.
 सरकारने काय करावे आणि काय करू नये याविषयी जोशींची मते ठाम होती. त्यानुसार सरकारने मुख्यतः कायदा व सुव्यवस्था (law and order) प्रस्थापित करावी, कारण तेच


                                      साहित्य आणि विचार - 451