पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका लेखात आणि एका मुलाखतीतही एका प्रश्नाला उत्तर देताना सुर्वे म्हणाले होते, "चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात लाखभर महिलांनी एका तालासुरात हे गाणं म्हटलं, हा कवी म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता."
 शेवटी जोशी यांचे भाषण झाले.
 ग्रामीण भागातील वाढती गुंडगिरी आणि ग्रामपंचायतींच्या व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांचा त्यांनी उल्लेख केला. या गुंडगिरीचा सर्वाधिक त्रास ग्रामीण महिलांनाच होतो. राजकीय सत्तेचे पाठबळ असल्यानेच ह्या स्थानिक गुंडांचे फावते व त्यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेच्या वातावरणात महिलांना दिवस कंठावे लागतात. इंग्रजांच्या काळात हिंमत करून पोलिसांकडे गेले तर संरक्षणाची काही प्रमाणात तरी शाश्वती असे; अलीकडे मात्र गुंड व पोलीस यांची हातमिळवणी झाली आहे असे वाटते. गुंड पोलिसांच्या थाटात फिरतात आणि पोलीस गुंडांसारखे वागतात. बाईवर अत्याचार झाला, तरी गुपचूप बसणे श्रेयस्कर; पोलिसांकडे गेले तर आणखी काय धिंडवडे निघतील सांगता येत नाही, असा विचार करून सगळे सहन करावे लागते. ही परिस्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक असते. स्थानिक पातळीवर ती बदलायला हवी व त्यासाठी ह्या स्थानिक पातळीवरची सत्ता महिलांच्या हाती असायला हवी. ते उद्दिष्ट समोर ठेवून आगामी निवडणुकांत शेतकरी संघटना फक्त महिला उमेदवार उभ्या करेल व स्वतःचे उमेदवार नसतील तेव्हा अन्य महिला उमेदवारालाच संघटनेचा पाठिंबा असेल असे ते म्हणाले.
 एक मुद्दा संघटनेच्या अर्थकारणाबद्दल होता. मागे ऊस आंदोलनानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दर टन उसामागे काही रक्कम संघटनेसाठी द्यावी व त्यांना देय असलेल्या रकमेतून कापून साखर कारखान्यांनी ती रक्कम संघटनेकडे द्यावी असे ठरले होते. पण प्रत्यक्षात त्यानुसार रक्कम जमा करण्यात बरेच साखर कारखाने चालढकल करत होते. "इतर पक्षांप्रमाणे संघटनेकडे पैसा नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. ताबडतोब निदान एक कोटी रुपये जमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, नाहीतर संघटना चालवणे अशक्य आहे. नपेक्षा मला संघटनेतून मुक्त करा," असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

 या आवाहनाच्या संदर्भात अधिवेशनाचा वृत्तान्त लिहिताना (शेतकरी संघटक, २८ नोव्हेंबर १९८६) नाशिकच्या मृणालिनी मुरलीधर खैरनार यांनी शेवटी नोंदवलेला हा एक हृद्य प्रसंग.

 अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडीचे एक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख यांच्या मातोश्री सभा संपल्यानंतर जोशींकडे आल्या व हातातला एक दागिना त्यांच्याकडे देत म्हणाल्या, "भाऊ, गेल्या कित्येक पिढ्यांत आमच्या दुःखांना वाचा फोडणारा कोणी भेटला नाही, तुम्ही पहिलेच. आम्ही तुमच्या बहिणी अजून संकटात आहोत. असं असताना तुम्ही मुक्ततेची भाषा करू नका. लग्नाच्या वेळी माझ्याकडे ३५ तोळे सोनं होतं. त्यातले २९ तोळे कर्जात गेलं. आता फक्त सहा तोळे शिल्लक आहे. तरीपण हा दागिना घ्या, पण संघटना चालू ठेवा, ही

किसानांच्या बाया आम्ही...२९१