पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेतनात किती वर्षे नोकरी केली यानुसार फारच फरक पडत असे. ही मागणी अगदी अलीकडे नरेंद्र मोदी सरकारने मान्य केली. किसान व जवान यांच्यात तसे भावनिक ऐक्य होतेच. 'जय जवान, जय किसान' या माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या प्रसिद्ध घोषणेत ते प्रतिबिंबित झाले आहे.
 या मेळाव्याची जय्यत तयारी केली गेली. १३ व १४ जुलै १९८९ रोजी दिल्लीतील मंदिर मार्गावरील एका सभागृहात किसान समन्वय समितीची बैठक झाली. इंडियन एक्स्प्रेसच्या वार्ताहर नीरजा चौधरी यांनी दिलेल्या बातमीनुसार, देशभरातील ३४ शेतकरी संघटनांचे १७५ प्रतिनिधी बैठकीला हजर होते. हे बहुतेक प्रतिनिधी अगदी गरीब परिस्थितीतील होते, अनेक जण स्वतःच शेतकरीही होते. दिल्लीला यायचा काहींचा हा पहिलाच प्रसंग होता. अनेकांकडे जेमतेम दुसऱ्या वर्गाच्या ट्रेन प्रवासापुरते पैसे होते. हे सारे बघून दिल्लीतील पत्रकारही भारावून गेले होते.
 ‘एक नेता, एक झेंडा, एक नाव' हा आपला नेहमीचा मुद्दा टिकैत यांनी इथेही रेटून धरला. आपणच देशभरातील शेतकऱ्यांचे नेते बनावे ही महत्त्वाकांक्षा आता त्यांच्या मनात उघड उघड निर्माण झाली होती. जोशींनी नेहमीप्रमाणे आपली समिती एक स्वतंत्र संस्था नसून ती इतर अनेक स्वतंत्र संस्थांमध्ये समन्वय असावा म्हणून निर्माण झाली आहे व त्यामुळे तिचे नेतृत्व हे सामूहिकच असावे: तसेच सध्या एक झेंडा, एक नाव यांचा आग्रह न धरता काही काळ तरी असेच अनौपचारिकपणे एकत्र काम करावे ही आपली बाजू मांडली. अन्य सर्व सदस्यांचा जोशींच्या म्हणण्याला पाठिंबा दिसल्याने टिकैतनी मग आपला आग्रह तात्पुरतातरी बाजूला ठेवला. बैठकीत मेळाव्यासाठी २ ऑक्टोबर १९८९ ही तारीख ठरली. बोट क्लब ही जागाही नक्की झाली.

 मेळावा यशस्वी व्हावा म्हणून जोशींनी आपले सगळे सामर्थ्य पणाला लावले. एका अर्थाने दिल्लीत होणारे ते शक्तिप्रदर्शनच होते. 'चलो दिल्ली' अशी घोषणा देत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने अनेक सभा घेतल्या, प्रचार केला. प्रत्यक्षात मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागीचे शेतकरी (सोबत बऱ्यापैकी संख्येने जवानही होते) आदल्या दिवशीच दिल्लीत येऊन दाखल झाले. पुन्हा हा मेळावा म्हणजे शासनपुरस्कृत शेतकरी मेळावा नव्हता; इथे ना कोणाला फुकट खायला दिले गेले, ना दारूची बाटली दिली गेली, ना काही पैसे दिले गेले, ना त्यांच्या जाण्यायेण्याची व राहण्याची काही सोय केली गेली. सर्व जण स्वतःच्या खर्चाने आले होते. दिल्लीकरांनी एवढा विशाल मेळावा व तोही अशा प्रकारे आयोजित केलेला, पूर्वी कधी पाहिला नव्हता. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत दाखल झाले होते. इतरही प्रांतांतून शेतकरी जमले होते. पंजाब-हरयाणातून अनेक जण ट्रॅक्टर घेऊन आले होते. आजूबाजूचे रस्ते त्या ट्रॅक्टर्सनी भरून गेले होते. सगळी दिल्लीच शेतकरीमय झाली होती. दोन ऑक्टोबरच्या सकाळपासून दिल्लीत सगळ्यांच्या तोंडी हाच विषय होता. सर्व वृत्तपत्रांनी मेळाव्याला भरपूर प्रसिद्धी दिली होती. दिल्लीतील राजकीय नेतेही ह्या मेळाव्याने हादरले होते. दिल्लीतील सत्तेपुढे हे शेतकऱ्यांचे आव्हान इतक्या मोठ्या प्रमाणावर

३५४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा