पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अजून मान्यताच मिळालेली नाही, असे लक्षात येताच 'उद्घाटनासाठी नव्हे, तर आपली ही सदिच्छाभेट आहे' असे ते म्हणाले. कॉलेजयुवकांच्या एनएसएस कँपसाठी जागा द्यायलाही स्थानिक माणसे तयार नव्हती. शेवटी प्रथमपासून शेतकरी आंदोलनात सहभागी राहिलेल्या निघोजे गावच्या रहिवाशांनी आपल्या गावाच्या शिवारात या कँपसाठी जागा दिली. अशा अनेक अडचणी संस्थेपुढे येत गेल्या. सध्या मात्र कॉलेजला शासकीय अनुदान वगैरे रीतसर मिळते व ती संस्था व्यवस्थित चालू आहे.
 शेतकरी संघटनेने कधी शरद पवारांशी जवळीक साधली, कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी, तर कधी भारतीय जनता पक्षाशी; पण कुठल्याच सोयरिकीतून हाती फारसे काही पडले नाही. ना राजकारण्यांनी त्यांना आपले मानले, ना मतदारांना जोशींची राजकीय भूमिका पटली. एकूणच, राजकारण जोशींना भावले नाही हे खरे.
 दरम्यान शरद जोशींनी अडगळीत पडलेल्या एके काळच्या स्वतंत्र पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला व त्याविषयी पुढे येणारच आहे. पण मतदारांनी तो कधीच गंभीरपणे घेतला नाही. एकूण राजकारणाचा रस्ता आता खुंटल्यात जमा होता. जोशीपुढचे पर्याय अशा प्रकारे एकेक करत कमी होत गेले.

 शेतकरी संघटनेच्या एका महत्त्वाच्या राजकीय प्रभावाची इथे नोंद घ्यायला हवी, कारण राजकीय विश्लेषक सहसा त्याचा उल्लेख करत नाहीत. १९८० ते १९९५ या पंधरा वर्षांत शेतकरी संघटनेने ग्रामीण महाराष्ट्रात उग्र चळवळ उभारली. रास्ता रोको, मोर्चे, मंत्र्यांना गावबंदी वगैरे अनेक उपक्रम राबवले. महिलांना रस्त्यावर उतरवले. तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संघटनेकडे वळले. त्या काळात विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव कमी झाला ह्याचे सर्वाधिक श्रेय शेतकरी संघटनेला द्यावे लागेल.
 मागे लिहिल्याप्रमाणे विदर्भात शेतकरी संघटनेच्या कामाला प्रथमपासून खूप जोर होता व त्याचा परिणाम तेथील राजकीय परिस्थितीवर नक्कीच होत होता. १९८५ साली संघटनेचे जे पाच आमदार प्रथमतःच निवडून आले त्यांतील चार विदर्भातील होते. कापूस आंदोलन आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी हे दोन मुद्दे याबाबत महत्त्वाचे ठरले. त्यातील कापूस आंदोलनाबद्दल पूर्वी लिहिलेच आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शेतकरी संघटनेने कायम पाठिंबा दिला; विशेषतः नव्वदच्या दशकात. अर्थात यामागे संकुचित असा स्थानिक अभिनिवेश नव्हता. संघटनेची त्यामागची व्यापक वैचारिक भूमिका स्पष्ट होती. त्यानुसार एकतर, कापसाचे भाव सरकारने कायम पाडल्यामुळे मुंबईतील कापडगिरणी मालकांचा सतत फायदा होत गेला, पण विदर्भातील शेतकरी मात्र खचत गेला. दुसरे म्हणजे, तेथील मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर विदर्भाच्या समृद्धीसाठी झाला नाही; तसे झाले असते तर पूर्वीप्रमाणेच आजही विदर्भ अन्य महाराष्ट्रापेक्षा अधिक समृद्ध राहिला असता. तिसरे म्हणजे, छोटी राज्ये प्रशासनाच्या दृष्टीने अधिक योग्य ठरतील असे संघटनेचे मत होते. म्हणून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा. विदर्भातील संघटनेच्या आंदोलनावर आधारित एक चित्रपट

राजकारणाच्या पटावर . ३३७

राजकारणाच्या पटावर३३७