पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयुष्यभरासाठी झोकून दिलेल्या गेल ऑमवेट यांनी काही रोचक निरीक्षणे नोंदवली आहेत. लेखांत त्या लिहितात, की हजारो, लाखो गरीब, मध्यम शेतकरी पुरुष 'घरच्या लक्ष्मी'च्या नावावर जमीन देतील असे दोन वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर त्यावर विश्वास बसला नसता, पण आज ते प्रत्यक्षात घडते आहे. याचे त्यांना खूप कौतुक आहे. शिवाय १९९०-९१ हे वर्ष म्हणजे महात्मा फुले यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचे व बाबासाहेब आंबेडकर यांच्या शंभराव्या जन्मतिथीचे वर्ष. पण तरी त्या वर्षीही त्यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या समाजात लक्ष्मीमुक्तीची माध्यमांनी जवळजवळ काहीच दखल घेतली नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. याबाबत गेल ऑमवेट यांचा निष्कर्ष असा आहे, "सर्व प्रसारमाध्यमे काही शहरी उच्च मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांच्या हातात आहेत आणि त्यांना शेतकरी महिला आघाडीकडे बघण्याची इच्छा नाही. उलट, संधी मिळताच त्या आघाडीबद्दल मुद्दाम गैरसमज पसरवतात. एकूणच शेतकरी संघटनेच्याविरुद्ध वातावरण मध्यमवर्गामध्ये आहे."

 महिला आंदोलनात शरद जोशी यांना अनेक प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांची साथ होती. आंदोलनाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता व त्यामुळे त्यांच्याविषयी न लिहिणे हे काहीसे अन्यायाचे होईल. गेल ऑमवेट, मधु किश्वर यांचा उल्लेख पूर्वी झालाच आहे. शेतकरी आंदोलनात ज्यांनी स्वतःला वेळोवेळी झोकून दिले अशा महिलांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांतील काही जणींबद्दल पूर्वी लिहिलेच आहे; सगळ्यांविषयी लिहिणे स्थलाभावी अशक्य आहे. तरीही केवळ वानगीदाखल, ज्यांच्याशी व्यक्तिशः चर्चा करायची संधी प्रस्तुत लेखकाला मिळाली व त्यामुळे ज्यांचे अनुभव अधिक विस्ताराने कळले अशा शैलजा देशपांडे व चेतना गाला सिन्हा याच्याविषयी इथे लिहित आहे.

 शैलजा देशपांडे या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातल्या. पण त्यांचे माहेर हिंगणघाटचे. वडील शं. ना. वखरे तेथील नगरपरिषदेचे उपाध्यक्ष होते. आर्थिक परिस्थिती चांगली होती. स्वतःचा छापखाना होता आणि 'झंझावात' नावाच्या साप्ताहिकाचे ते संपादनहीं करत. शेतीशी काहीच संबंध नव्हता. वाचनाची, कवितांची शैलाताईंना फार आवड, शेतीविषयी मात्र त्यांचे मत वाईटच होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते! आर्वी गावी राहणाऱ्या आपल्या काकांकडे त्या आल्या असताना शेजारीच राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मिलिंद देशपांडे यांच्याशी त्यांचे लग्न ठरले. सासरी आल्यावर आयुष्यात प्रथमच त्यांचा शेतीशी थेट असा संबंध आला.

 १९८६ साली चांदवड अधिवेशनाच्या वेळी त्यांची व जोशींची प्रथम गाठ पडली. त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या कापूस आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे महिलांच्या पुढाकाराने झालेल्या रेल रोकोत त्या रुळावर आडव्या झाल्या होत्या. तिथेच त्या पकडल्या गेल्या. नागपूर तुरुंगात त्यांना डांबण्यात आले. योगायोगाने जोशी व त्यांचे अनेक सहकारी त्यावेळी त्याच तुरुंगात होते. त्या महिलांच्या बाबतीत हा आयुष्यातील

३०४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा