पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वगैरे अनेक मुद्द्यांवर प्रचलित विचारांपेक्षा अगदी वेगळे विचार या जाहीरनाम्यात मांडले आहेत आणि त्यांचा अभ्यास व्हायला हवा.
 राजकीयदृष्ट्या या पुनरुज्जीवित स्वतंत्र भारत पक्षाला फारसे भवितव्य असणार नाही हे जोशाना व सर्वच संबंधितांना ठाऊक होते. पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या अत्यल्प मतांवरून मतदारांनीही त्यांना फारशा गांभीर्याने घेतले नाही हे स्पष्ट होते.

 आपल्या पक्षाच्या भूमिकेबद्दल जोशींनी एके ठिकाणी म्हटले आहे,
 "आमची वैचारिक भूमिका ही पॉलिटिकली इंपॉसिबल आहे हे आम्हांला माहीत आहे. 'मी तुला झुणका-भाकर केंद्र काढून देतो' किंवा 'मी तुम्हाला दोन रुपये किलो दराने तांदूळ देतो' असं म्हणणाऱ्याला आपल्याकडे मतं मिळतात. पण 'तुमच्यात हिंमत असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुमच्या कष्टाचे उचित फळ तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभी करतो' असं म्हणणाऱ्याला मात्र आपल्याकडे मतं मिळत नाहीत. पण तरीही आमची भूमिका आम्ही मांडत राहिली पाहिजे. स्वतंत्र भारत पक्षाचं काम म्हणजे 'to keep the flag flying until what is politically impossible today, becomes economically inevitable.”


स्वतंत्र भारत पक्ष हादेखील जोशींनी राजकीय क्षेत्रात घेतलेला एका नव्या दिशेचाच शोध होता. हा फक्त शेतकऱ्यांचा पक्ष नव्हता, तो शेतकरी संघटनेचा विस्तारित भागही नव्हता; तो सगळ्या देशासाठीचा पक्ष होता. देशातील प्रचलित राजकारणात त्याचे फारसे महत्त्व नव्हते हे उघडच आहे; त्याचे महत्त्व या पक्षाच्या जाहीरनाम्याच्या निमित्ताने जोशींनी वैचारिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या स्वरूपात आहे. भविष्यकाळात कदाचित एक दिवस असा येईल, जेव्हा हेच विचार समयोचित व अपरिहार्य ठरतील.

 शेवटी एक नमूद करायला हवे. जोशी यांना राजाजी हे नेहमीच आदर्शवत वाटत. त्यांच्या आंबेठाण येथील घरातल्या बेडरूममध्ये मला फक्त एकच फोटो आढळला - राजाजी यांचा.

 



अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा४३१