पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शेतकरी संघटनेपासून फारकत घेतली. 'शेतकरी संघटना आणि स्त्री-प्रश्ना'चे आकलन या आपल्या लेखात (अंतर्नाद, ऑक्टोबर २००९) शेतकरी महिला आघाडीबरोबर काम करतानाच्या आपल्या अनुभवांवर आधारित मांडणी केली आहे. "ब्रिटिश राज्यकर्त्याप्रमाणेच शरद जोशीही 'झिरपण्याच्या सिद्धांता'वरच भर देत होते, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. इतिहास नाकारून उभे राहिलेले हे आंदोलन कुंठित झाले तर नवल नाही." हा त्या लेखाचा शेवट आहे.
 डॉ.द. ना. धनागरे यांच्या Populism and Power - Farmers' movement in Western India: 1980-2014 (Routledge प्रकाशन) या इंग्रजी पुस्तकाचा विषयच शेतकरी संघटनेचे आंदोलन हा आहे; शीर्षकात सूचित केलेली आहे तशी जोशींवरची बरीच टीका या पुस्तकात आढळते.
 इतरही काही टीकाकार होते. उदाहरणार्थ, शेतकरी चळवळ ही श्रीकांत सोळंके यांची कादंबरी व तिला डॉ. भा. ल. भोळे यांनी लिहिलेली प्रस्तावना. वृत्तपत्रांतूनही जोशींवर टीका करणारे अनेक लेख वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. उदाहरणार्थ, शरद जोशींना खुले पत्र हा प्रा. शरद पाटील यांनी लिहिलेला लेख (दै. लोकसत्ता, ९ नोव्हेंबर २००३). अशा लेखांची संख्या तर बरीच भरेल.
 या साऱ्याची दखल घेणे, किंवा केवळ नोंद करणे, हेही स्थलाभावी इथे अशक्य आहे. पण या साऱ्यातील जेवढे शक्य होते तेवढे मिळवायचा आणि वाचायचा, प्रस्तुत लेखकाने प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे माधवराव मोरे यांच्यापासून विनय हर्डीकरांपर्यंत आणि चंद्रकांत वानखडेंपासून विजय साळुखेपर्यंत ज्यांच्यापाशी जोशींबाबत काही कटू आठवणी असणे शक्य होते अशा जास्तीत जास्त लोकांना भेटायचा, त्यांची बाजू समजून घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शेवटी जसे बघावे, तसे दिसते, ह्यात बरेच तथ्य आहे.

 जोशी यांना स्वतःला अशा टीकाकारांबद्दल काही म्हणायचे होते का? संभाषणात हा विषय अधूनमधून निघायचा. त्यांच्या म्हणण्याचा गोषवारा सांगायचा, तर तो पुढीलप्रमाणे सांगता येईल:
 'माझं नेतृत्व अनुयायांनी तसं सहजतःच स्वीकारलं होतं; मी काही ते कोणावर लादलं असं नव्हतं. मला आठवतं, एकदा एक तरुण कार्यकर्ता मला बरंच काय काय सुनावत होता; मी फक्त ऐकत होतो. जरा वेळाने एक दुसरा वरिष्ठ व अत्यंत कर्तबगार सहकारी, जो पुढे मोठा आमदारही झाला, तो त्याला माझ्यासमोरच म्हणाला; 'हे पाहा, मातीने कुंभाराला अक्कल शिकवायची नसते!' म्हणजे जणू मी कुंभार व तो माती याचा तिथे सहजस्वीकार होता!
 'पण हळूहळू त्यांच्यातील काहींना आपल्यामुळेच संघटना चालते असं वाटू लागलं. येणारे पाहुणे मलाच भेटायचे, मी काय म्हणतो तेच पत्रकार छापायचे. हे काही मी जाणीवपूर्वक करत नव्हतो, पण तसं होत होतं. आपण डावलले जात आहोत अशी भावना त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण होत असावी. व्यक्तिगत मत्सराची भावनाही त्यामागे असू शकेल.


सहकारी आणि टीकाकार . ३९९