पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 तशी एकूणच जगात आज महात्म्यांची सद्दी संपली आहे असे त्यांना वाटे. दुसऱ्या एका जुन्याच लेखात ते लिहितात,

अर्थशास्त्राच्या जगात समाजव्यवस्थाच नव्हे, तर अगदी राज्यव्यवस्थासुद्धा उलथवून टाकणारे ग्रंथ एकेकाळी झाले. सगळ्या आर्थिक चलनवलनाचा संदर्भच बदलून टाकणारे ग्रंथराज १९३० सालापर्यंत प्रकाशित होत. अ‍ॅडम स्मिथचा ग्रंथ या नमुन्याचे पहिला आणि लॉर्ड केन्सचा 'सर्वदूर सिद्धांत' हे बहुधा शेवटचे उदाहरण. त्यानंतर कितीएक महान अर्थशास्त्री झाले; महाकष्टाने जमा केलेली प्रचंड आकडेवारी आणि माहिती, गणकयंत्राच्या साहाय्याने विश्लेषण करून पुढे मांडणारी कित्येक पुस्तके झाली; अर्थशास्त्रज्ञांना दरवर्षी नोबेल पुरस्काराचा रतीब सुरू झाला; पण लोकांची डोकी साफ धुऊन काढून त्यांना एक नवी स्वच्छ समज देणारा 'सर्वदूर सिद्धांत' पुन्हा झाला नाही. आता न्यूटन होत नाहीत. डार्विन होत नाहीत. लुई पाश्चर होत नाहीत. मादाम क्युरी होत नाहीत. याचा अर्थ संशोधन होत नाही असा नाही; त्यापेक्षा प्रचंड संशोधने होत आहेत; पण 'क्वांटम थिअरी'चा जनक कोण, आणि गुणसूत्रांच्या क्षेत्रातील कोलंबस कोण याचे उत्तर फार थोड्यांना माहीत असेल.

(अन्वयार्थ – एक, पृष्ठ ९४-५)


  जोशींचे असे मूलगामी चिंतन वाचले, की विवेकानंदांनी स्वतःविषयी लिहिलेला व दत्तप्रसाद दाभोळकर यांनी उद्धृत केलेला एक मुद्दा आठवतो. ते लिहितात,

 "मला आता एक गोष्ट समजली आहे. एकाच व्यक्तीने दार्शनिक, नेता, संघटक, कार्यकर्ता या भूमिका करणे शक्य नसते. त्यामुळे विचारांचे, संघटनेचे आणि आंदोलनाचे अपरंपार नुकसान होते.”
 जोशींना काळाच्या ओघात ह्या साऱ्या भूमिका बजावाव्या लागल्या. त्यांनी केवळ एखादा सूत्रस्वरूपातील विचार मांडला नाही, त्यांनी त्या विचारातून एक संपूर्ण तत्त्वज्ञान उभे केले, एक संपूर्ण विचारधारा उभी केली; त्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक प्रबळ संघटना उभारली, कार्यकर्ते घडवले, अनेक आंदोलने लढवली. हे सारे त्यांनी विलक्षण ताकदीने केले यात शंकाच नाही; पण कधीकधी वाटते, जोशींचा खरा पिंड एकांड्या विचारवंताचाच असावा. आंदोलनाला मिळालेला लक्षावधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना स्वतःलाही अनपेक्षित होता. त्या यशाने ते त्यावेळी भारावून गेले असावेत; पण ते यश म्हणजेच त्यांच्यातील विचारवंतासाठी एक पिंजरा ठरला का?
 कधी कधी असेही वाटते, की हा माणूस मूलत:च इतरांपासून खूप वेगळा होता. "माझ्यासारखा माणूस कुठच्याच धर्मात, पंथात, पक्षात, गटात बसणारा नाही," असे ते एकदा म्हणाले होते. अन्य राजकारणी, समाजकारणी, नोकरशहा, अर्थतज्ज्ञ, लेखक, पत्रकार, डावेउजवे, समाजवादी-हिंदुत्ववादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेकाप यांच्यापैकी कुणाशीच त्यांचे फार जमले नाही; आणि खरे म्हणजे भोवतालाशी जुळवून घ्यायची त्यांना कधी आवश्यकताही


सांजपर्व - ४८७