पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. शेतकऱ्याला ते दाम मिळत नाही, म्हणून आपल्यावर अन्याय होतो अशी त्याची तक्रार असते; आणि ती खरीच असते; पण त्याचवेळी तोच शेतकरी स्वतःच्या बायकोला मात्र तिच्या घामाचे काहीच दाम न देऊन तिच्यावर अन्यायच करत असतो. म्हणजे एका पातळीवर शेतकरी अन्यायाचा बळी असतो तर दुसऱ्या घरगुती पातळीवर तो अन्याय करणाराही असतो.

 ही विसंगती आपल्या भाषणांमधून सगळीकडे मांडायला जोशींनी सुरुवात केली. उपस्थित शेतकरी बांधवांना उद्देशून ते म्हणत,
 'एक दिवस भल्या पहाटे उठा; म्हणजे घरची लक्ष्मी उठायच्या आधी उठा. पेन्सिल घ्या आणि ती जे जे काम करताना दिसेल ते कागदावर टिपायला सुरुवात करा. चुलीचं, पोतेऱ्याचं, पोरांचं, जनावरांचं, रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायचं, धुणी धुवायचं, भांडी घासायचं, अंगणातलं, शेतातलं, सरपणाचं, गोवऱ्यांचं, जे जे काम ती करेल ते टिपून ठेवा. रात्री सगळी निजानीज होईपर्यंतची सगळी कामं अशी टिपून ठेवा. पोरांना सकाळी पावशेर दूध जास्त मिळावं म्हणून अर्ध्या रात्री उठून गुरांना ती चारा घालते तेही टिपून ठेवा.
 'आणि मग सांगा, तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या दररोजच्या कामाचे तास किती होतात? पंधरा तासांपेक्षा कमी नक्कीच नाही. आता या सगळ्या श्रमाचं मोल काय? सगळी कामं ती ज्या प्रेमाने, ममतेने करते, त्याची किंमत एकवेळ शून्य धरा. तुमची, पोराबाळांची, वडीलधाऱ्यांची आजारपणात ती जी सेवा करते, त्याचीही किंमत एकवेळ शून्य धरा. पण रोजगार हमी योजनेत मातीच्या पाट्या टाकणाऱ्या बाईची किमान रोजी तरी तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या नावाने लावाल की नाही?
 एका दिवसाचा हिशेब झाला रुपये ३०. तिला सुट्टी कुठली? उलट, जगाचा सण म्हणजे तिला दुप्पट उस्तवार. समजा, तुमची लक्ष्मी हळदीच्या पावलांनी तुमच्या घरी आली, त्याला आता २० वर्षं झाली. प्रत्येक भावाने आपापल्या घरचा हिशेब मनाशी करून पाहावा. वर्षाचे निदान दहा हजार रुपये होतात. म्हणजे २० वर्षांच्या कामाची फक्त रोजीच झाली रुपये दोन लाख, तिला मिळालं काय? अंगावर कापड आणि पोटातली भाकर! सोसायटीचं देणं एवढं थकलं असतं, तर वीस वर्षांनी आज थकबाकी किती निघाली असती? रुपये आठ लाखाच्यावर! हे तुम्ही तिचं देणं लागता.
 'हिंदू समाजात दोन प्रकारच्या देव-देवता मानतात – मंगल देवता आणि ओंगळ देवता. मंगल देव म्हणजे विष्णू, कृष्णासारखे. त्यांना प्रसन्न केलं तर ते भलं करतात. पण पूजाअर्चा काही केली नाही, तरी त्यांची काही तक्रार नसते. याउलट गावोगावचे म्हसोबा-खंडोबा या ओंगळ देवता. त्यांना जत्रेच्या दिवशी बैल दाखवला नाही, की आटोपलाच कारभार! सगळी माणसं ओंगळ देवतांची मर्जी संपादायला धावतात; मंगल देवतांकडे कोणी लक्ष देत नाही.

 सोसायट्या, बँका हे सगळे ओंगळ सावकार. ते तगादे लावतात, जीप पाठवून भांडी उचलतात, कोर्टात जातात, जप्ती करवतात. त्यांची कर्ज फेडण्याकरता आपण जिवाचा आकांत करतो. घरची लक्ष्मी सावकार खरी, थोड्याथोडक्या रकमेची नव्हे, चांगली आठ-दहा

२९८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा