पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोकळी करून दिली. पुढे श्रेयाचे कन्यादानही भाऊंनीच केले.
 विनय हर्डीकर हे शेतकरी संघटनेचे एक वेगळेच कार्यकर्ते. वेगळे अशा अर्थाने, की अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे ते शेतकरी कुटुंबातील वा ग्रामीण भागातील नव्हते. मूळचे ते मुंबईकर, पुढे उच्चशिक्षणाच्या निमित्ताने पुणेकर. इंग्रजीत एमए. व्यवसायाने पत्रकार. वृत्तीने विचारवंत. उत्तम लेखक. तेवढेच उत्तम टीकाकारही. शेक्सपीअरपासून शास्त्रीय संगीतापर्यंत अनेक क्षेत्रांत रुची आणि गती. आणीबाणीत तीन महिने कारावास भोगलेला. ज्ञानप्रबोधिनीपासून ग्रामायनपर्यंत अनेक संस्थांशी संबंध. पण एका जागी फारसे कुठे स्थिरावले नाहीत. सप्टेंबर १९८१मध्ये पिंपळगाव बसवंत येथे त्यांची व जोशींची पहिली भेट झाली. इंडियन एक्स्प्रेसमधील नोकरी सोडून ते १९८६च्या जानेवारीपासून जोशींबरोबर पूर्ण वेळ काम करू लागले. 'अन्य संघटना संपर्क' हे खाते त्यांच्यावर सोपवलेले.
 आणखी एक कार्यकर्ते परभणी जिल्ह्यातील सेलू गावचे गोविंदभाऊ जोशी. एक सधन शेतकरी. १९७० सालचे परभणी कृषी महाविद्यालयाचे प्रथम वर्गातले पदवीधर. शेतीप्रमाणेच संगीताचीही खूप आवड. वसंतराव देशपांडे हे त्यांचे मित्र. त्यावेळच्या सरकारी धोरणानुसार आधुनिक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार व्हावा म्हणून त्यांनी १९७४च्या सुमारास कृषी सेवा केंद्र सुरू केले. गूळ गाळण्याची मोठी यंत्रणा उभारली. देना बँकेकडून कर्ज काढले. त्यात स्वतःचीही बरीच गुंतवणूक केली. दुर्दैवाने त्याच परिसरात पुढे गोदावरी-दुधना सहकारी साखर कारखाना निघाला. शासकीय नियमांप्रमाणे उसावर प्रक्रिया करणारी दुसरी कुठलीच यंत्रणा कारखान्याच्या परिसरात उभारता येत नाही. कारखान्याचे चेअरमन काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या दडपणामुळे गोविंदभाऊंना युनिट बंद करावे लागले. पोलिसांच्या साहाय्याने युनिटची वीजच बंद केली गेली! कर्जाचा बोजा मात्र डोक्यावर कायम राहिला. पुढे त्यांनी उत्तम प्रकारची ज्वारी विकसित केली. तिला बाजारात सुमारे दीडशे रुपये क्विटल असा भावही मिळत होता. पण दुर्दैवाने ती ज्वारी लेव्हीपोटी सरकारकडे जमा करावी लागली. तीही फक्त पन्नास रुपये क्विटल दराने! सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांची पावलोपावली कशी कोंडी होते ह्याचा त्यांना आलेला हा दुसरा व्यक्तिगत अनुभव. पुढे १९८४ सालच्या परभणी अधिवेशनापासून ते शरद जोशींच्या सहवासात आले आणि मग ती साथ कायमचीच ठरली.
 गोविंद जोशी हे शेतीसोबतच शेतीसामानाचे एक दुकानही चालवतात. जोशींवर कुठलेही संकट आले, अडचण आली तर तत्काळ धावून जाणारी ही व्यक्ती. आम्ही ट्रेनने एकदा नांदेडला चाललो असताना न्याहारीचा डबा घेऊन ते मुद्दाम चार तास खर्च करून सेलूहून आले होते. जोशीवरच्या प्रेमापोटी.

 तसेच परभणीचे वकील व लेखक अनंतराव उमरीकर व त्यांचे प्रकाशक-लेखक चिरंजीव श्रीकांत उमरीकर. पुढे श्रीकांत उमरीकरांनी जोशींचे समग्र साहित्य प्रकाशित करून मोठेच काम केले. म्हात्रे यांच्यानंतर काही काळ 'शेतकरी संघटक'ची धुराही त्यांनी वाहिली; अंकाला आकर्षक, आधुनिक रूप द्यायचा प्रयत्न केला. पण पुरेशा जाहिराती मिळवता न आल्याने वा अन्य काही अडचणींमुळे 'संघटक' बंद पडले. अनेकांना त्याची आजही हळहळ वाटते.

३८२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा