पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळे एकदम चमकले, अचंबित नजरेने सिन्हांकडे बघू लागले. क्षणात खोलीत तणाव जाणवू लागला. त्याही काहीशा वरमल्या. पण नंतर लगेच जोशी स्वतः म्हणाले, "चेतना म्हणते, ते खरं आहे. मीटिंगमध्ये बसलेल्या कोणाही एका व्यक्तीला जर माझ्या स्मोकिंगचा त्रास होत असेल, तर मी मीटिंगमध्ये स्मोकिंग करणे गैर आहे." त्यानंतर त्यांनीही संघटनेच्या सभांमध्ये सिगरेट ओढणे थांबवले. बऱ्याच जणांना हा प्रसंग ठाऊक नसेल, पण जोशी एखाद्या अगदी नव्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे पटले, तर ऐकत असत हे यावरून जाणवते.
 कवी इंद्रजित भालेराव यांनी त्यांच्याबरोबर आंबेठाण येथे घालवलेल्या दोन दिवसांबद्दल लिहिले आहे. त्यावेळी जोशी त्यांच्याशी टेबल टेनिस खेळण्यात रंगले होते आणि दोनदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असतानाही जिद्दीने भामचंद्रचा डोंगर चढून गेले होते.
 प्रत्येक वेळी कार्यकर्त्याने कार्यकर्ता याच भूमिकेत राहिले पाहिजे, जीवनातील आनंदापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे असे जोशींना अजिबात वाटत नसे. खूपदा आपल्या मनमोकळ्या वागण्याने जोशी वयातले अंतरही सहजगत्या मिटवून टाकत. एकदा ते आगगाडीने अहमदाबादला जात असताना चेतना सिन्हा त्यांच्यासोबत होत्या. प्लॅटफॉर्मवर उभे असताना हातातले कोल्ड ड्रिंक कोण लौकर संपवतो यावर त्यांच्यात पैज लागली होती! ती अर्थातच सिन्हा जिंकल्या होत्या!

 प्रत्येक वेळी इतर मंडळीच जोशींकडे आकृष्ट होत असे नव्हते, कधी कधी जोशी स्वतःहूनही काही जणांशी संपर्क साधत. शिवाय, प्रत्येकाने सामाजिक कार्यकर्ताच बनले पाहिजे असे जोशींना अजिबात वाटत नसे. त्यापेक्षा वेगवेगळ्या जीवनक्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवावे असे जोशींना वाटे.
 उदाहरणार्थ, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित अशोक निरफराके. एसएससीच्या परीक्षेत ते संपूर्ण महाराष्ट्रात पहिले आलेले. त्यांची एक कविता एका मासिकाच्या 'युवा' विशेषांकात प्रकाशित झाली होती. तिचे 'ततः किम्?' हे संस्कृत शीर्षक आकर्षक वाटल्याने जोशींनी ती दोन-तीनदा वाचली. 'ठीक आहे, आलो पहिला, गाजवले कर्तृत्व, पण म्हणून काय झाले? आता पुढे काय?' असा काहीसा तिचा सूर होता. त्यांना २१ फेब्रुवारी १९९७ रोजी जोशींनी आपणहूनच एक मोठे, सहा पानी पत्र पाठवले होते. त्यात जोशी लिहितात,

राष्ट्रसेवा घडली पाहिजे अशी आपली दुर्दम्य आकांक्षा आहे. राष्ट्रसेवा म्हणजे आपण काय करू इच्छिता, हे मात्र लक्षात येईना. या देशातील कोट्यानुकोटी लोक दैन्यात आहेत; ते दैन्य दूर करण्यासाठी काही पौरुषाची प्रतिज्ञा आपण करू इच्छिता? जगभरात आज संशोधनाचा रथ प्रचंड वेगाने चालला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, जेनेटिक्स या क्षेत्रांत तर अद्भुत अवतरत आहे. तुम्ही राष्ट्रसेवा, राष्ट्रसेवा जी म्हणता, ती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काही ज्ञानकण जोडून दिल्याने होणार नाही का?

सहकारी आणि टीकाकार३९१