पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांचे सरकारदेखील इंदिराजींनी पाठिंबा काढून घेताच कोसळले व पुन्हा इंदिराजीच पंतप्रधान बनल्या.
 महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. १९७८ साली पाचवी विधानसभा अस्तित्वात आली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. पण त्यांचेच एक सहकारी शरद पवार यांनी बंडखोरी केली, पक्ष फोडला. पुरोगामी लोकशाही आघाडी (Progressive Democratic Front अथवा पीडीएफ) ह्या नावाखाली पुढे पवार मुख्यमंत्री बनले. पण त्यांचेही सरकार औटघटकेचे ठरले. नंतर राष्ट्रपती राजवट आली. १९८० सालच्या निवडणुकांनंतर सहावी विधानसभा अस्तिवात आली. ह्या विधानसभेने अब्दुल रेहमान अंतुले, बाबासाहेब भोसले व वसंतदादा पाटील हे तीन मुख्यमंत्री बघितले. पण ह्या साऱ्या नेत्यांच्या मांदियाळीत जनतेवर प्रभाव पडेल असे नेतृत्व कोणीच दिले नाही. किंबहुना ह्यांतला प्रत्येक मुख्यमंत्री हा केवळ दिल्लीपतींच्या कृपेमुळे मुख्यमंत्री बनला आहे ह्याची पूर्ण कल्पना सामान्य जनतेला होती. ह्या सगळ्यातून एकूण राजकीय प्रक्रियेविषयी लोक निराश झाले होते व त्यामुळेही जोशींची राजकारण दूर ठेवायची भूमिका शेतकऱ्यांना पटणारी होती.

 सुरुवातीच्या दिवसांत सर्वच राजकारण्यांनीदेखील एकतर शेतकरी संघटनेकडे दुर्लक्ष केले किंवा तिला विरोध तरी केला. आपले विचार अगदी स्वच्छ आहेत व त्यांच्या जोरावर आपण शेतकऱ्याशी थेट नाते जोडू शकतो याची खात्री असल्याने स्वतः जोशी यांनीही कधी राजकारण्यांची फारशी पत्रास बाळगली नाही. किंबहुना, त्यांना कटाक्षाने दूर ठेवण्याचाच प्रयत्न केला.
 इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाविषयी त्यांना आदर होता. या पक्षाचे कार्यकर्ते तळमळीचे आहेत असेही त्यांचे मत होते. या पक्षावर त्यांनी एक तेहतीस पानांची पुस्तिकाही लिहिली. असे विस्तृत लेखन जोशींनी अन्य कुठल्याच पक्षाबद्दल केलेले नाही. जोशींच्या विश्लेषणानुसार फुलेवादापेक्षा त्या पक्षाने मार्क्सवाद अधिक जवळचा मानला. शेतकऱ्यांपेक्षा कामगारांशी अधिक जवळीक साधायचा प्रयत्न केला व ती त्यांची घोडचूक ठरली, कारण त्यातूनच त्यांना दुभंगलेले व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले; पुढे त्यांचे अनेक मोहरे यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसमध्ये खेचल्यामुळे, पण मुख्यतः वैचारिक परभृततेमुळे, तो पक्ष प्रभावहीन झाला.
 शेतकरी संघटनेला राजकीय नेत्यांनी केलेल्या विरोधाची कारणमीमांसा करताना जोशी म्हणतात,

 "शेतकरी संघटनेचं यश हे अनेक राजकारणी पुढाऱ्यांच्या आयुष्याचं अपयश आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी असं म्हणत त्यांनी वर्षानुवर्षं घालवली, परंतु त्यांना ते जमलं नाही. पण आमचं शेतकरी आंदोलन केवळ दहा महिन्यांत उभं राहतं, सर्व शेतकरी जात-पात-धर्म-पक्ष कशाचाही विचार न करता एकत्र येतात, मोठा शेतकरी-छोटा शेतकरी, शेतकरी-शेतमजूर असे तथाकथित भेदसुद्धा विसरून एकत्र येतात, ह्यातच त्यांचं अपयश आहे. ते

३१४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा