पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून रुपये पाच हजार का अशीच काहीतरी रक्कम मिळाली.
 अर्थात प्रश्न पैशाचा नव्हता; अन्यायाचा प्रतिकार करण्याचा होता. संघटित नोकरदारांकडून होत असलेल्या गळचेपीविरुद्ध सर्वसामान्य नागरिकांनी धैर्याने आवाज उठवला पाहिजे असे जोशी नेहमीच म्हणत. ह्या प्रकरणी कामगार संघटना जोशीच्या विरोधात गेल्या व राजकीयदृष्ट्या त्यांनी असे काही करणे अगदी अव्यवहार्य होते यात शंका नाही. पण अशा बाबतीत जोशींनी अनेकदा अप्रिय असली तरी आपल्या विवेकबुद्धीला पटतील अशीच पावले उचलली. राजकीय व्यूहाचा भाग म्हणून वेगवेगळ्या पक्षांना वेळोवेळी पाठिंबा दिला तरी विचारांच्या बाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही.
 ज्याला राजकारणात सौदेबाजी म्हणतात, किंवा भरपूर पैसे वा अन्य लाभ घेऊन राजकीय भूमिका बदलणे म्हणतात, तसा प्रकारही जोशींनी कधीच केलेला नाही; तसा आरोपही कोणी त्यांच्यावर केलेला नाही. त्यांचे जे अनुयायी पुढे आमदार वगैरे झाले तेही प्रामाणिकच राहिले; मोरेश्वर टेमुर्डे किंवा वामनराव चटप यांच्यासारखे त्यांचे सहकारी आमदार बनल्यावरही कायम लाल एसटीतून किंवा साध्या स्कूटरवरून प्रवास करत राहिले. राजकारणात अनेकदा असे कसोटीचे क्षण येतात, जेव्हा केवळ एक-दोन मतांवर सत्तेवर कोण येणार हे ठरते. कधी अविश्वासाचा ठराव असतो, कधी पक्षांतर्गत बंडाळी असतात. आपल्या मताची किंमत करोडोंच्या हिशेबात घेतली जाते व दिलीही जाते. अशा कुठल्याच प्रसंगी शेतकरी संघटनेचे उमेदवार मोहाला बळी पडले नाहीत.

 लक्षावधी शेतकऱ्यांना पेटवणाऱ्या आपल्या आंदोलनांचा अपेक्षित फायदा शेतकरी संघटनेला निवडणुकांमध्ये का उठवता आला नाही?
या अपयशाची मीमांसा करायचा प्रयत्न अनेकांनी केला आहे व वेगवेगळी कारणे पुढे आणली आहेत. पुनरुक्ती टाळण्यासाठी फक्त एकाची कारणमीमांसा ती बऱ्यापैकी प्रातिनिधिक वाटल्याने इथे उदधृत करत आहे.

 ६ मार्च १९९५च्या शेतकरी संघटकमध्ये 'स्वतंत्र भारत पक्षाला मतदारांनी का नाकारले?' या विषयावर आपापली मते कळवण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रतिसाद म्हणून वाचकांची सुमारे शंभरेक पत्रे आली. त्यातील मोरेश्वर टेमुर्डे (पाटील) यांचे एक पत्र २१ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. ते स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे संयोजक होते. त्यांची मीमांसा त्यावेळी नुकत्याच पार पडलेल्या १९९४च्या सार्वत्रिक निवडणुकींच्या संदर्भात केलेली असली, तरी शेतकरी संघटनेच्या एकूणच राजकीय अपयशाला ती लागू पडू शकते. मुख्य म्हणजे संघटनेच्या मुखपत्रात तिला स्थान मिळालेले आहे. निवडणुकीचे तंत्रच वेगळे असते' या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या आपल्या त्या अभ्यासपूर्ण पत्रात टेमुर्डे यांनी दिलेली काही कारणे संक्षेपाने पुढीलप्रमाणे आहेत :

राजकारणाच्या पटावर३४१