पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दोन्हींचाही त्यांनी परिचय करून दिला आहे. या दुसऱ्या पुस्तकात 'मनुष्यप्रकृती एकसूत्री नाही. त्यात अर्थप्रवृत्ती आहे तितकीच निसर्गसिद्ध करुणेची भावना आहे.' अशी मांडणी आहे.
 Road to Serfdom या एफ. ए. हायेक याच्या १९४४ सालच्या पुस्तकाचा परिचय इथे वाचायला मिळतो. सुरुवातीला एकहीं प्रकाशक ते छापायला तयार नव्हता, कारण सर्व तत्कालीन विचारवंतांचा त्यातील भूमिकेला प्रचंड विरोध होता. पण पुढे त्याची महती समाजाला पटली. १९७४चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्याला मिळाला होता. 'कोणत्याही मिषाने का होईना, पण एकदा सरकारी नियोजन आले, की नागरिक बाहुली बनतात आणि सरकार हुकूमशहा' हे त्याचे मुख्य प्रतिपादन. सरकारीकरणाला विरोध करणारे आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार मांडणारे हे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक मानले जाते.
  बर्नार्ड मांदेविल ह्या १६७० साली जन्मलेल्या डच-इंग्लिश मानसोपचार तज्ज्ञाने लिहिलेल्या फेबल ऑफ द बीझ (मधमाश्यांची परीकथा) या एका आगळ्या पुस्तकाचा परिचय विशेष वेधक आहे. मुळात हे पुस्तक म्हणजे एक विनोदी ढंगाने लिहिलेली दीर्घ कविता होती. 'माणसाचे मैत्री, प्रेमभावना इत्यादी निसर्गसिद्ध गुण किंवा विवेक आणि संयम यांसारखे त्याने संपादिलेले गुण यांतून मोठ्या संस्कृती उगम पावत नाहीत; उलट, ज्याला आपण वाईट बुद्धी समजतो, अनैतिकता मानतो त्यातूनच सर्व समाजप्रिय प्राण्यांत मजबूत नाती तयार होतात. त्यातूनच जीवन, व्यापारउदीम आणि वैभव उद्भवतात.' हे त्याचे सूत्र होते. जोशींच्या मते अ‍ॅडम स्मिथ आणि आयन रँड यांच्यावर ह्या पुस्तकाचा बराच प्रभाव होता. ह्या लेखकाचा काळ म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील उत्तरार्ध व त्यानंतरच्या काही वर्षांचा काळ; पण त्या काळात पाश्चात्त्य जग आपल्यापेक्षा किती पुढे गेले होते आणि किती वेगवेगळे विचार तेथील विचारवंत मांडत होते ह्याकडे जोशी वाचकाचे लक्ष वेधतात.
 किंबहुना या सगळ्या पुस्तकात त्या-त्या पुस्तकाच्या काळात आपल्या देशात काय घडत होते याची तुलनाही ते करतात व त्यातून आपण जगाच्या किती मागे होतो हेही दाखवून देतात.
 डॉ. ज्युलियन सायमन या अर्थतज्ञाच्या The Ultimata Resourses आणि The State of Harmony या दोन पुस्तकांचा जोशींनी एकत्रित करून दिलेला परिचय अतिशय रोचक आहे. विशेष म्हणजे हे लेखक १९९७ साली शेतकरी संघटनेचा सहभाग असलेल्या देवळाली येथील एका परिसंवादाला हजर राहिले होते. त्यांची ओळख 'आशावादी अर्थतज्ज्ञ' अशी आहे. त्यांच्या मते, धर्माचा आणि राजसत्तेचा पगडा जसजसा कमी होत गेला, तसतशी माणसाची प्रगती झाली, जीवनमान सुधारत गेले; स्वातंत्र्य आणि प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; व्यापक परिप्रेक्ष्यात बघितले तर चिंतातुर विचारवंतांनी काहीही म्हटले तरी माणसाची सतत प्रगतीच होत गेली आहे, तथाकथित प्रदूषणदेखील प्रत्यक्षात कमी-कमी होत गेले आहे, जगातील खनिजे वगैरे संपायची अजिबात शक्यता नाही, तशा प्रकारची वेळोवेळी मांडली जाणारी भिती अगदी अवाजवी आहे अशी त्यांची मांडणी आहे. एकेकाळी जमीन हीच सर्वांत मोठी साधनसंपत्ती होती; पण पुढे जमिनीपेक्षा भांडवल, त्यानंतर भांडवलापेक्षा तंत्रज्ञान आणि आता तंत्रज्ञानापेक्षा 'योजक' म्हणून माणूस हाच उत्पादनाचा सर्वाधिक महत्त्वाचा घटक

४४२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा