पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या जातीचा नाही याचा प्रभाव परिणामकारक ठरतो... प्रत्येक निवडणुकीत आपण मार खाल्ला. एका निवडणुकीत आपण असे म्हटले, की या निवडणुकीत एकच उमेदवार आहे - तो म्हणजे कर्जमुक्ती. तेव्हाही कर्जमुक्ती या उमेदवाराला मते मिळाली नाहीत.

(पृष्ठ २८३-४)

 यानंतर लगेचच ६ डिसेंबर २००४ मध्ये लिहिलेल्या 'राजकीय भूमिकेचे चक्रव्यूह' या आपल्या लेखात जोशी प्रांजळपणे म्हणतात,

निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्ही मला प्रेमाने बोलावता. पण ज्यांनी माझी पूर्वीची शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरील भाषणे ऐकली आहेत, त्यांच्या लक्षात आले असेल, की माझी ती भाषणे आणि या निवडणूक प्रचारातील भाषणे यांत जमीनअस्मानाचे अंतर होते. मी पूर्वी काय भाषणे करत होतो आणि आता निवडणुकीत मला काय भाषणे करावी लागत आहेत, याची मला त्याक्षणी लाज वाटत असे. हा सरळसरळ वैचारिक वेठबिगाराचा किंवा वैचारिक व्यभिचाराचाच प्रकार झाला. ही वेठबिगारी अशीच राहणार असेल, तर शेतकरी चळवळीला माझा जो उपयोग आहे, तोच संपून जाईल. माझ्या चष्म्याची काच तडकून जाईल. त्यामुळे सध्या चालवून घ्यावे' या विचारामागे राजकीय संधिसाधूपणा आहे. ज्यांच्या महत्त्वाकांक्षा राजकीय आहेत, ते आपल्याला फरफटत नेतात अशी माझी भावना होत आहे.

(पोशिद्यांची लोकशाही, पृष्ठ २९८-९)

 राजकीय अपयशाची टोचणी स्वतः जोशींना किती लागली होती व ते काहीसे अगतिक कसे झाले होते हे ह्यावरून जाणवते.
 पण राजकीय अपयश मिळाले तरी त्यामुळे जनमानसातील जोशींबद्दलचा आदर कमी झाला असे मात्र म्हणता येत नाही. जोशींचे एकेकाळचे सहकारी नागपूरचे प्रा. शरद पाटील यांचा 'शरद जोशी संपले काय?' या शीर्षकाचा एक लेख 'लोकमत'च्या ९ जून २०००च्या अंकात प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी राजकारणात उतरण्याचा जोशींचा निर्णय हा शंभर टक्के त्यांचा स्वतःचा होता असे म्हणतानाच असेही लिहिले आहे की, “या निर्णयाच्या मुळाशी त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ मुळीच नव्हता याचीसुद्धा मला एकशेएक टक्के खात्री आहे. त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. अन्न-वस्त्र-निवारा यापलीकडे त्यांच्या गरजा नाहीत. मानसन्मानांची त्यांना हाव नाही. व्यवस्था बदलण्याचे एक प्रभावी साधन म्हणून त्यांना सत्ता हवी होती."

 जोशींच्या जवळजवळ सर्वच कार्यकर्त्यांची भावना साधारण अशीच आहे. राजकारणात उतरण्याचा निर्णय त्यांनी स्वार्थापोटी घेतला असे कोणीच समजत नाही, पण तो चुकला कारण

राजकारणाच्या पटावर३४३