पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'नांगरून पडलेली जमीन...' या आपल्या एका लेखात (शेतकरी संघटक, २० एप्रिल १९८४) परभणी कृषी विद्यापीठातील एक विद्यार्थी व आता लातुरात असलेले प्राध्यापक शेषराव मोहिते लिहितात,

बऱ्याच दिवसांनंतर परवा गावाकडे गेलो होतो. तो बोडका माळ पार रया गेलेल्या म्हाताऱ्या माणसासारखा दिसत होता. नांगरून पडलेली जमीन पावसाची वाट पाहत, आसुसलेल्या नजरेनं आकाशाकडे पाहत सुस्त पडून होती. आक्रसलेल्या चेहऱ्याची माणसं भवितव्य नसल्यासारखी, अंधारात चाचपडल्यासारखी सारी जमवाजमव करण्याच्या मागे लागली होती. पण सहज बोलता बोलता शेतकरी आंदोलन, शरद जोशी, शेतकरी संघटना, शेतीमालाला भाव असले काही शब्द ऐकले, की युगानुयुगापासून पावसाची वाट पाहत नांगरून पडलेल्या जमिनीवर पावसाची सर बरसावी अन् ढगात वीज चमकून जावी, तशा त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या चमकत होत्या. हा 'काळ' आता आपली फार दिवस सोबत करणार नाही असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

 शेषराव मोहिते यांचा हा भावपूर्ण उतारा त्याकाळी शेतकरी समाज जोशींकडे किती असोशीने पाहत होता याची साक्ष पटवणारा आहे. अशा माणसाकडे समर्पणोत्सुक तरुण मने आपोआपच आकृष्ट होतात.
 डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात,

शेतकरी संघटनेचे अधिवेशन हा एक थरारक, भारावून टाकणारा अनुभव असतो. तीनचार वर्षांपूर्वी मी एक अधिवेशन पाहण्यासाठी गेलो होतो. खेड्यापाड्यातून पुरुष, बायका, मुलं झुंडीने येत असतात. मोटारसायकलीने, सायकलीने, बैलगाडीने वा पायी, बहुसंख्य बायका व मुलांच्या पायात चपला नसतात. हे आंदोलन धनदांडग्या शेतकऱ्यांचे नाही. सारेच शेतकरी गरीब असतात, पिळलेले असतात. त्यांच्यात धनदांडगा नसतो. धनदांडगा शेतकरी ही शहरी माणसाची कविकल्पना आहे, हे जाणवत राहते. साऱ्या जागेला एखाद्या वसाहतीचे स्वरूप आलेले असते. बायका, मुले काट्याकुट्या गोळा करून कोरड्यास भाकरी बनवत असतात. शरद जोशींना खडी तालीम देऊन त्यांचे होणारे स्वागत चित्तथरारक असते.

 आणि या तीव्र आकर्षणाचे दुसरे कारण म्हणजे जोशींचे व्यक्तिमत्त्व.
 जोशींनी आंदोलनाला सुरुवात केली, तेव्हा त्या ग्रामीण परिसरात ते साहजिकच उठून दिसत असत. शहरी, सुशिक्षित, ब्राह्मण, परदेशातली भारी पगाराची नोकरी सोडून इथे आलेला हा माणूस. याउलट ग्रामीण भागातली बहुतेक मंडळी गरीब, अल्पशिक्षित होती; पण तरीही त्यांच्याशी जोशी बरोबरीच्या नात्याने वागत असत. उच्चनीचतेच्या कल्पना हाडीमाशी रुजलेल्या तत्कालीन ग्रामीण समाजात जोशींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे अंग ह्या तरुणांना पहिल्या

३७८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा