पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपल्या कार्यकर्त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून जोशींनी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यासाठी आपली इतर कामे बाजूला ठेवून भरपूर वेळ काढला. प्रवासात व एरवीही त्या कार्यकर्त्यांची बौद्धिक वाढ कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यांचे क्षितिज अधिक विस्तृत व्हावे म्हणून त्यांच्यातील काहींना किसान समन्वय समितीच्या देशपातळीवरील कामात सहभागी करून घेतले व स्वतःबरोबर वेगवेगळ्या प्रांतांत नेले. मे १९९९मध्ये संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांसाठी त्यांनी युरोपचा दोन आठवड्यांचा दौराही बेल्जियममधील 'युरोपा बायो' या संस्थेमार्फत आयोजित केला होता. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केला गेलेला हा पहिला आणि शेवटचा विदेश दौरा.
 शेतकरी संघटना उभारण्यासाठी अनेक कार्यकर्ते उभे करावे लागतील याची जोशींना पूर्ण जाणीव होती व म्हणूनच त्यांनी असे कार्यकर्ते उभे करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. खन्ना येथील किसाननेत्यांच्या बैठकीत ते म्हणाले होते त्याप्रमाणे ते आणि कार्यकर्ते यांच्यातील नाते त्यांनी आई आणि मूल यांच्यातील नात्याप्रमाणेच मानले व तसे ते जपलेही. प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल त्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे ते पावले उचलत गेले.उदाहरणार्थ, नरेन्द्र अहिरेसारख्या त्यांच्या एका खंद्या कार्यकर्त्याला त्यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून यायची प्रेरणा दिली तर अंजली कीर्तनेसारख्या लेखिका-विचारवंत मंबईकर महिलेला स्वतंत्र भारत पक्षाचे चिटणीस बनवले.
 जोशींकडे आकृष्ट झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते. काही जण खरे तर स्वतःच मान्यवर नेते होते. उदाहरणार्थ, अंबाजोगाईजवळच्या मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे. जोशींपेक्षा ते चार वर्षांनी मोठे. जोशी भारतात यायच्यापूर्वीच त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेली अशी 'शेतकरी संघटना, मोरेवाडी' स्थापन केली होती. शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या इतर सर्व संस्था कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होत्या. त्या काळात खरे तर, मराठा समाजातील बहुतेक सुशिक्षित तरुण यशवंतराव चव्हाणांमुळे काँग्रेसकडे आकृष्ट होत होते. त्यांना सत्ताही सहजतः मिळत होती. पण श्रीरंगनानांनी तो मोह टाळला. शेतकरीहित हेच आपले कार्यक्षेत्र ठरवले. आपले विचार श्रीरंगनाना मोठ्या धाडसाने मांडत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी तब्बल ६४ दिवस संप पुकारला होता. त्या संपाच्या विरोधात नानांनी 'भ्रष्टाचारी नोकरशाहीचा धिःकार असो' अशी घोषणा देत शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. याचा धागा पुढे शेतकरी संघटनेने भ्रष्टाचाराच्या विरोधात जे Q' आंदोलन छेडले त्याच्याशी जुळतो. १९८० ते १९८४ अशी चार वर्षे नानांनी 'भूमिसेवक' नावाचे एक पाक्षिकही चालवले. मुख्यतः त्यात त्यांचेच लेख असत; पण एक वेगळेपण म्हणजे पाक्षिकाच्या प्रत्येक अंकात प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची एखादी कविता प्रसिद्ध होत असे. पुढे नानांनी मुद्दाम नाशिकला जाऊन जोशींची भेट घेतली व ते जोशींच्या विचारांनी इतके भारावून गेले, की आपली संघटना त्यांनी जोशींच्या संघटनेत विलीन करून टाकली.
.

 श्रीरंगनाना हे एक टोक पकडले तर वसमत तालुक्यातील जवळाबाजारचे पुरुषोत्तम

सहकारी आणि टीकाकार३८९