पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांचे होते – बरेच कार्यकर्ते यांच्या निम्म्या वयाचे होते. त्यांच्या दृष्टीने जोशी म्हणजे घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती बनली.
 आयुष्यातल्या वेगवेगळ्या संकटांशी झगडताना हेच शेतकरी संघटनेचे कुटुंब जोशींच्या पाठीशी सतत उभे राहिले. याचे एक उदाहरण म्हणजे लीलाताईंनी स्वतःचा विषप्राशन करून दुर्दैवी शेवट करून घेतला तो क्षण. त्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. बरीच शोधाशोध केल्यावर घराच्या गच्चीवरच लीलाताईंचा देह सापडला होता. घाईघाईने त्यांना आधी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधे नेले गेले. दैवदुर्विलास म्हणजे नेमकी त्यावेळी आंतरराज्य समन्वय समितीची (Interstate Coordination Committee) वर्ध्याला बैठक ठरली होती. ऑक्टोबर १९८२चा तो शेवटचा आठवडा होता. पुण्यात लीलाताईची तब्येत तेव्हाही बरी नव्हती; पण ती बैठक हा जोशींचाच पुढाकार होता आणि शिवाय १४ राज्यांतील शेतकरीनेते हजर राहणार होते. त्यामुळे मग जोशी शेवटी वर्ध्याला गेले होते.

 ती घटना आठवताना सरोजताई काशीकर लिहितात,

३० व ३१ ऑक्टोबर १९८२ रोजी वार्ध्याला आंतरराज्यीय किसाननेत्यांची परिषद होती. देशभरातून प्रमुख लोक आले होते. परिषद सुरू झाली. नंतर चार वाजता खुली सभा होती. पण ११ वाजताच लीलाताई गेल्याची बातमी आली. साहेबांना ती कळल्यावर परिषदेची ती बैठक पूर्ण करूनच साहेब म्हात्रेसर व प्रल्हाद पाटील कराड यांच्यासोबत गाडी घेऊन १२०-१४०च्या वेगाने पुण्याला निघाले.

या कठीण काळात जोशींना त्यांच्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी मोठा आधार दिला. त्या काळातील आपल्या आठवणीही सरोजताई सांगतात. त्या लिहितात,

गौरी व श्रेया या लीलाताईंच्यासोबत वर्ध्याला येऊन गेल्या होत्या. लीलाताई गेल्यावर त्यांच्यासोबत राहायला जावं म्हणून विजय व वृषाली काटकर, त्यांची दोन मुलं व आमचे वैभव व अश्विन ह्यांच्यासह आम्ही आंबेठाणला गेलो. मुलांमध्ये श्रेया, गौरी व साहेब छान मिसळले. काटकरांच्या मुलींना ते पिपाण्या म्हणत; कारण दोघी एकाच वेळी रडत असत! तिथल्या मुक्कामात आम्ही श्रेया, गौरी व साहेबांसोबत जवळचा भामचंद्र डोंगर चढायला शिकलो. आपण डोंगर चढू शकतो हा आत्मविश्वास आम्हा दोघा नवराबायकोत निर्माण झाला. मुलांची तर मज्जाच होती. अश्विन तर साहेबांच्या पाठीवर बसूनच डोंगरावर यायचा.

साहेब विदर्भात आले, की वर्ध्याच्या मुक्कामी सर्व कार्यकर्ते जमायचे. घरी रात्री जेवणं आटोपली, की वरच्या गच्चीत गाण्याच्या भेंड्यांचा कार्यक्रम व्हायचा. यात आम्ही सर्व सहभागी होत असू. भाऊ व माई बोरावके, बद्रीनाथ व शुभांगी देवकर या सगळ्यांची मैफल असायची. एकमेकांवर भेंड्या चढवण्यात आम्ही तत्पर असायचो. तेव्हा साहेब आमचे नेते हा भावच कोणाच्या मनात नसायचा. त्यामुळे

सहकारी आणि टीकाकार - ३९३