पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाजूक हालचाली करणाऱ्या पुरुषाला अकारण 'बायल्या' म्हणून हिणवले जाऊ लागले, तर धडाडी दाखवणाऱ्या स्त्रीवर अकारण 'पुरुषी' असल्याचा शिक्का मारण्यात आला. स्त्रीची गुलामगिरी ही पुरुषांनाही बाधक ठरली, कारण त्यांच्यावरही काही अपेक्षित गुणांचे प्रदर्शन करत राहण्याची सक्ती निर्माण झाली. स्त्रियांवर लादलेल्या दुर्बलतेमुळे त्यांच्यावर तर अन्याय झालाच, पण त्याचबरोबर अवास्तव व न झेपणाऱ्या कठोरतेचे सोंग घेणे भाग पडलेल्या पुरुषावरही तसाच अन्याय झाला. शेतकरी संघटनेच्या स्त्रीआंदोलनाचे एक उद्दिष्ट ही ठोकळेबाज श्रमविभागणी रद्द करून प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो वा पुरुष असो, तिच्या वैयक्तिक गुणधर्माप्रमाणे आयुष्याचा आराखडा ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळावे हे होते.
 जोशी यांच्या मते पुरुषाचे मानले गेलेले गुण स्त्रियांमध्ये दिसायचे आणि स्त्रियांचे म्हणून मानले गेलेले गुण पुरुषांमध्ये दिसायचे प्रमाण काळाच्या ओघात वाढू शकेल. काही प्रगत देशांमध्ये 'बाळंतपणासाठी' म्हणून स्त्रियांना रजा देतातच, पण शिवाय त्याचवेळी 'शिशुसंगोपनासाठी' म्हणून नवऱ्यांनाही भरपगारी सुट्टी दिली जाते. 'चूल आणि मूल' यातच अडकून न पडणाऱ्या महिला आता सर्रास दिसतात. नवऱ्यापेक्षा जास्त कमावणारी पत्नी किंवा घरकाम करण्यात पत्नीपेक्षा जास्त वाटा उचलणारा नवरा आढळणे आधुनिक शहरी समाजाततरी तितकेसे दुर्मिळ राहिलेले नाही. किंबहुना मानववंशाचा इतिहास हा स्त्रियांच्या वाढत्या पुरुषीकरणाचा आणि पुरुषांच्या वाढत्या स्त्रीकरणाचा इतिहास आहे असेही काही जण मानतात.
 या अनुषंगाने जोशींनी आणखी एक विचार मांडला आहे. ते म्हणतात,
 "शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरुषांचे पौरुष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले."
 ह्या विचाराचा अधिक विस्तार मात्र जोशींनी कुठेच कधी केलेला नाही. आपण पुरुषाच्या नजरेला अधिकाधिक सुंदर व आकर्षक दिसावे ही भावना यातूनच स्त्रियांच्या मनात निर्माण झाली का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न ह्या विधानातून वाचकाच्या मनात निर्माण होतात.
 मध्ययुगातील आणि सरंजामशाहीतील लुटालुटीचा कालखंड हा शेतीतील उत्पादनाच्या लुटीशी निगडित आहे व स्त्रियांची गुलामगिरी ही ह्या लुटालुटीच्या व्यवस्थेला तोंड देण्यासाठी उभी केलेली आपत्कालीन व्यवस्था होती. तात्पुरता वाटणारा आपत्काळ हा हजारो वर्षे टिकला. स्त्रियांनी अनपेक्षित संकटाला तोंड देण्यासाठी एक ओझे स्वीकारले, पण सिंदबादच्या सफरीच्या गोष्टीतील म्हाताऱ्याप्रमाणे ते ओझे हजारो वर्षे झाली, तरी खाली उतरायलाच तयार नाही!

 देवाने स्त्रीपुरुष वेगळे निर्माण केले, पण त्या वेगळेपणात श्रेष्ठता-कनिष्ठता नाही. बायकांनी चूलमूल सांभाळावे व पुरुषांनी घराबाहेरील कामे करावीत ही आज सर्वत्र दिसणारी पद्धत काही कोण्या परमेश्वराने घालून दिलेली नाही. स्त्रियांनी शिकारीचे, लढाईचे काम करावे आणि पुरुषांनी घरकाम सांभाळावे अशी रचना असणारे समाजही असू शकतात, किंबहुना इतिहासात

२८८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा