पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोशींची इच्छा होती. बाजारपेठेत जेव्हा माल विकणारा व विकत घेणारा समोरासमोर येतात तेव्हा असेच काहीतरी त्यांच्यात घडते. मग तो प्रसंग अगदी आपण भाजीवाल्याकडून रोजची भाजी खरेदी करतानाचाही असू शकतो. किती किमतीच्या खाली वस्तू विकायची नाही, ह्याचा विचार विकणारा करत असतो आणि किती किमतीच्यावर ती खरेदी करायची नाही, याचा विचार खरेदी करणारा करत असतो. दोघेही समोरच्याला किती ताणणे शक्य आहे याचा मनातल्या मनात अंदाज घेत असतात. मग घासाघीस करता करता एक क्षण असा येतो, की आपण अती स्वस्तात वस्तू विकली असे दुकानदारालाही वाटत नाही व आपण वस्तूसाठी अवाच्या सवा किंमत मोजली असे खरेदी करणाऱ्यालाही वाटत नाही. दोघांचे असे समाधान होऊन जेव्हा व्यवहार होतो तेव्हा तो उत्तम व्यवहार असतो; तेव्हाची किंमत ही योग्य किंमतच असते. दिल्लीत बसून नियोजन मंडळाचे अधिकारी बाजारपेठेतील एखाद्या वस्तूची जी किंमत आपल्या हिशेबासाठी गृहीत धरतात, तो अंदाज नेहमीच चुकतो आणि या उलट बाजारातील अडत्यांचा किंमतीचा अंदाज अधिक बरोबर ठरतो. म्हणूनच सामूहिक निर्णयापेक्षा, संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयापेक्षा, पंचायतीने घेतलेल्या निर्णयापेक्षा एखाद्या व्यक्तीने घेतलेले निर्णय बरोबर असायची शक्यता अधिक असते. कारण निर्णय घेण्याची क्षमता एका व्यक्तीकडेच असते, समूहाकडे नसते. एखाद्या व्यक्तीकडेच विशिष्ट असे संवेदनापटल असते. त्यानुसार एखाद्या विशिष्ट आनंदासाठी किती किंमत चुकवणे योग्य होईल, तो कसा मिळवता येईल याचाही निर्णय ती व्यक्ती स्वतःपुरता घेत असते. दुसरी कुठली यंत्रणा तो निर्णय त्या व्यक्तीसाठी घेऊ शकत नाही (Arrow's Theorem).
 दोन व्यक्तींमधील संवादही ह्या संवेदनपटलामार्फत अचूक होतो. वुडहाउसच्या कादंबरीत एका इंग्लिश उमरावाच्या हवेलीत लग्नाप्रीत्यर्थ जमलेल्या प्रचंड गर्दीत आणि आसपासच्या गलबल्यातही दोन प्रेमिक केवळ नेत्रपल्लवीने आपल्या भेटीचे स्थळ व वेळ अचूक ठरवतात, त्याप्रमाणे! बाजारातील व्यवहाराबद्दल अशी काहीतरी जोशींची एकूण धारणा होती व ह्या कल्पनेचा त्यांना वेगवेगळ्या अंगांनी बराच विस्तार करायचा होता.
  एकदा हृदयविकाराच्या झटक्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी ते दोन महिने गुजरातमध्ये विश्रांती घेत होते. त्यावेळी रोज संध्याकाळी ते फिरायला बाहेर पडत व एका विशिष्ट जागी जमलेल्या श्रोत्यांसमोर 'बाजारपेठेचे अध्यात्म' ह्या विषयावर व्याख्यान देत. ही सारी मांडणी त्यांच्या मनातही तशी धूसरच होती, पण ती नीट तयार व्हावी म्हणूनच त्यांनी हा व्याख्यानांचा घाट घातला होता. एखाद्या विषयावरील आपले विचार पक्के व्हावेत यासाठी ते खूपदा त्या विषयावर व्याख्याने द्यायचा मार्ग अवलंबत. त्या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रणही झाले होते; पण त्यांचे शब्दांकन उपलब्ध नाही. 'बाजारपेठेचे अध्यात्म' हे पुस्तक शेवटपर्यंत त्यांच्या हातून लिहून झाले नाही.

 'नेतृत्वाचे अध्यात्म' या दुसऱ्या संकल्पित पुस्तकात नेत्याला समाजच स्वत:च्या कालसापेक्ष गरजांनुसार पुढे आणत असतो, नेत्याच्या कर्तृत्वामुळे वा काही अंगभूत गुणांमुळे


                                       साहित्य आणि विचार - ४४९