पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

समारंभाचे व नंतरच्या जेवणाचे साधे, अनौपचारिक पण आकर्षक आमंत्रणपत्र उपलब्ध आहे. श्रेया व्यवसायाने आर्किटेक्ट झाली व आता ती दोघे कॅनडात ओटावा येथे स्थायिक आहेत.
 धाकट्या गौरीने वर्ध्याला एमबीबीएस केल्यानंतर एमडी फ्रान्समधून केले. पण नेत्रतज्ज्ञ असून युएसमध्ये तिचे वैद्यकीय प्रशिक्षण प्रमाणित धरले गेले नाही. ती आता युएसमध्ये न्यू जर्सी येथे राहते. शेतकरी संघटकच्या एका जुन्या अंकात (२१ जून १९९५) ३ व ४ जून रोजी आंबेठाण येथे भरलेल्या संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचे वृत्त आहे. त्या वृत्ताच्या शेवटच्या परिच्छेदात लिहिले आहे,

 "बैठकीच्या शेवटी शरद जोशींनी आपल्या या सर्व स्नेही मंडळींना स्नेहभोजन दिले. प्रयोजन होते, त्यांची धाकटी लेक गौरी हिचे लग्न. गौरीचे लग्न १९ फेब्रुवारी ९५ रोजी अमेरिकेत झाले, त्यावेळी शरद जोशी गुजरातमध्ये निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते; ते स्वतः लग्नाला जाऊ शकले नाहीत.”
 जानेवारी २००९ मध्ये परभणी येथे संघटना कार्यकारिणीच्या एका बैठकीत भाषण करताना जोशींनी एक हृदयद्रावक कथन केले होते. प्रकाशित झालेले जोशींचे ते शेवटचे भाषण. त्यात ते म्हणाले होते,

आणखी एक आठवण, जी मी फारशी कोणाला सांगत नाही, माझ्या मनाला नेहमी डाचत असणारी आहे. शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात सुरू केलेली शेतकरी चळवळ देशभरात उभी राहिली, तरच शेतकऱ्यांच्या दुःस्थितीत काही फरक पडेल, फक्त महाराष्ट्रातले प्रयत्न पुरे पडणार नाहीत, हे लक्षात घेऊन १९८१च्या ऑक्टोबरमध्ये देशभरातील समविचारी शेतकऱ्यांच्या नेत्यांची आम्ही एक बैठक वर्ध्याला बोलावली होती. मी तिकडे जाण्याची तयारी करीत असताना माझ्या पत्नीने, लीलाने, माझ्याकडे हट्ट धरला, की मी वर्ध्याच्या या कार्यक्रमाला जाऊ नये. पण माझा वर्ध्याला जाण्याचा निश्चय पक्का आहे, हे लक्षात आल्यानंतर ती माउली मला मोठ्या तळतळाटाने म्हणाली, नको म्हणत असतानासुद्धा तुम्ही मला आणि मुलींना सोडून जात आहात; हे शेतकरीसुद्धा तुम्हाला एक वेळ सोडून जातील हे लक्षात ठेवा.' शेतकरी संघटनेच्या कुटुंबात आजवर वेळोवेळी जे काही घडले आहे, आणि घडते आहे, ते पाहिले, की वाटते की माझ्या पत्नीचा शाप खरा ठरला आहे.

[[right|(माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणीनो... पृष्ठ ३११)}}
  जोशी वर्ध्याला असतानाच लीलाताई हे जग सोडून गेल्या व अखेरच्या क्षणी ते त्यामुळे पत्नीसोबत नव्हते हे लक्षात घेतले की ह्या घटनेतील कारुण्य मनाला अधिकच भिडते.
  अर्थात ही जखम तशी कधीच पूर्णतः भरून येणारी नसली तरी, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी आपल्या या एकाकी नेत्याला कायम प्रेम दिले हे जाणवते. संघटनेच्या कार्यात माझं कुटंब उद्ध्वस्त झालं, पण आजही महाराष्ट्रातल्या शेकडो कुटुंबांत वावरताना ती माझीच कुटंबं आहेत असं मला वाटतं,' अशी भावना जोशींनीही अनेकदा कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली आहे.

,

सहकारी आणि टीकाकार - ३९५