पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 असेच दुसरे एक उदाहरण. कृष्णा खोरे पाणी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे व आंध्र प्रदेशचा जास्त फायदा करून दिला गेला आहे अशी एक भावना महाराष्ट्रात होती. अशा प्रश्नांवर सर्व पक्षभेद विसरून आपल्याकडे राज्यातील सर्व लोक एक होतात असा अनुभव आहे. या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू केंद्रापुढे जोरकसपणे कशी मांडता येईल याचा विचार करण्यासाठी १९८५च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत या विषयाचे एक तज्ज्ञ आणि महाराष्ट्र सरकारचे एक प्रमुख अभियंता जांभळे आपली अभ्यासपूर्ण मांडणी करू लागले. नंतर त्यावर आपले मत व्यक्त करताना जोशी म्हणाले होते, “या चर्चेत वा मांडणीत मला रस नाही. भारतातील कोणत्याही शेतकऱ्याला ते पाणी मिळाले तरी त्यात माझ्या मते काही फरक पडत नाही." त्यावेळची जोशी यांची ही प्रतिक्रिया जांभळे यांना धक्कादायक वाटली होती; पण जोशींची एकूण वैचारिक बैठक पाहता ही प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक अशीच होती.

 शरद जोशींचे दुसरे वैचारिक वेगळेपण म्हणजे त्यांची ठाम अर्थवादी भूमिका. या भूमिकेमुळेच त्यांनी शेतकऱ्यांना शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघायला शिकवले. शेतीच्या संदर्भात हा निखळ अर्थवादी विचार जोशींनीच प्रथम मांडला. उगाचच काळी आई', 'शेतकरीधर्म' असले भावक शब्दप्रयोग करून ते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळले नाहीत, किंवा त्यांनी शेतकऱ्यांचा बुद्धिभेद केला नाही. शेती हा एक व्यवसाय माना, ह्याच्यातून तुम्हाला पुरेशी आर्थिक प्राप्ती व्हायलाच हवी; ती होत नसेल तर ह्यातून बाहेर पडून तुम्ही दुसरा कुठलातरी व्यवसाय करायला हवा,' असे ते म्हणत.
 ही दृष्टी म्हणजे जोशींच्या एकूण अर्थवादाचा आणि त्यांच्या स्वतंत्रतावादाचाच एक आविष्कार होता आणि ह्याच भूमिकेतून त्यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचाही सतत पाठपुरावा केला.
 बंदिस्त अर्थव्यवस्थाच ज्यांच्या अंगवळणी पडली आहे त्यांना हे खुलीकरण सुरुवातीला अवघड जाईल याची जोशींना पूर्ण कल्पना होती. चीनमधल्या एका प्रथेचे उदाहरण ते या संदर्भात देत. एकेकाळी चीनमध्ये मुलींची पावले लहान असणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. त्यामुळे मुलगी जन्मताच तिचे पाय पट्ट्यांनी बांधून ठेवले जात. साम्यवादी क्रांतीनंतर ह्या प्रथेवर बंदी घालण्यात आली. इतकी वर्षे ज्यांचे पाय बांधून ठेवले होते, त्या साऱ्यांच्या पायाच्या पट्ट्या सोडल्या गेल्या. त्यावेळी त्या बदलाला त्या महिलांचाच जोरदार विरोध झाला. कारण प्रथमच त्यांच्या पायांतून जेव्हा रक्त मोकळेपणे वाहू लागले, आखडलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्या, तेव्हा त्या वेदना महिलांना सहन होईनात; कारण त्या नसांना वाहत्या रक्ताची सवयच नव्हती. पुढे अर्थातच त्या वेदना नाहीशा झाल्या व मग पट्ट्या सोडल्याचे व पाय मोकळे झाल्याचे अवर्णनीय सुख आयुष्यात प्रथमच जाणवू लागले. जोशींच्या मते खुलीकरणाच्या ह्या सुरुवातीच्या काळात भारतीयांची स्थिती त्या चिनी महिलांसारखीच आहे. 'नको ते खुलीकरण, नको तो जगभरातून येणारा माल, नको ती स्पर्धा,


                                      साहित्य आणि विचार - ४५५