पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या स्थानिक भाषेतच आपले विचार नेमकेपणे मांडू शकत. या सगळ्यामुळे एकूण चर्चेचा स्तर खालचाच राहायचा. समन्वय समितीला किंवा देशव्यापी आघाडीला नाव कुठले द्यायचे हा प्रश्नही कधीच समाधानकारकरीत्या सुटला नाही, याचे कारण भाषिकच होते. शेवटी भारतीय किसान युनियन हे नाव सर्वानुमते ठरले, पण तेही फारसे रूढ झाले नाही.
 शेतकरी नेत्यांमधेही साम्यापेक्षा फरकच अधिक होता. पुढे डंकेल प्रस्तावाच्या वेळी तो सर्वांपुढे ठसठशीतरीत्या स्पष्ट झाला. सगळ्यांचा बौद्धिक स्तर, राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती, जीवनविषयक एकूण दृष्टिकोन हे सगळेच खूप भिन्न होते. उदाहरणार्थ, जोशी कायमच खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक होते व त्यामुळे डंकेल प्रस्तावाला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला. हा पाठिंबा जाहीर करण्यासाठी त्यांनी ३१ मार्च १९९३ रोजी दिल्लीत बोट क्लबवर शेतकऱ्यांचा अखिल भारतीय मेळावा घ्यायचे जाहीर केले. नेमक्या याच वेळी डंकेल प्रस्तावाला विरोध करणारा शेतकरीनेत्यांचा जो मोठा गट होता त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत डंकेलविरोधी मेळावा घ्यायचे जाहीर केले. त्या विरोधी मेळाव्याचे आयोजन महेंद्रसिंग टिकैत, कर्नाटक रयत संघाचे प्रा. नंजुंडस्वामी व पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा यांनी केले होते. असेच मतभेद तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेचे स्वातंत्र्य, शेतीतील सरकारची भूमिका, सबसिडीचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर होते.

 अखिल भारतीय किसान यूनियनची घटना निश्चित करण्यासाठी भरलेल्या खन्ना येथील पहिल्या बैठकीच्या वेळीच खरे तर जोशींचे विचार इतर सर्वापेक्षा खूप वेगळे होते हे जाणवले होते. त्या बैठकीत इतर अनेक मागण्या शेतकरीनेते मांडत होते. त्यावेळी जोशी म्हणाले होते त्याप्रमाणे, त्यांच्या मते 'आपल्या चळवळीची ही सुरुवात आहे व सध्यातरी शेतीमालाला रास्त भाव मिळवणे हाच आपला एक-कलमी कार्यक्रम असावा. महाभारतातल्या त्या प्रसिद्ध कथेत ज्याप्रमाणे अर्जुनाला आसपासची झाडे, फांद्या, पक्षी वगैरे न दिसता, ज्याचा वेध घ्यायचा तो पोपटाचा डोळाच फक्त दिसत होता, त्याचप्रमाणे आपले सगळे लक्ष त्या एककलमी कार्यक्रमावरच केंद्रित केले पाहिजे. तसे नसेल तर आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद, सहकारी कारखान्याचे अध्यक्षपद, वेगवेगळ्या बड्या शासकीय समित्यांचे सदस्यत्व अशा इतरच अनेक गोष्टी धनुर्धाऱ्याला दिसू लागतात! मग नेम हमखास चुकतोच! एकदा आपल्याला रास्त भाव मिळायला लागले, की स्वबळावरच आपण बाकी सारे प्रश्न सोडवू शक. त्यामळे त्या एकमेव उद्दिष्टासाठी लढणारे शेतकरी संघटन उभे करणे हेच आपले ध्येय असावे. त्यासाठी आपली संघटना अगदी लवचीक असावी. परंतु काटेकोर आणि पक्की अशी घटना संमत केली की, कार्यकारिणी, पावती पुस्तके, हिशेब ठेवणे, सभासदांची यादी, निवडणुका वगैरे सोपस्कार आपोआपच येतात. सामान्य सभासद ते अध्यक्ष अशी पदाधिकाऱ्यांची उतरंड येते. अशा साचेबद्ध संघटना आपल्या अवतीभवती अनेक असतात व ती साचेबद्धताच संघटनेला निर्जीव बनवून टाकते. मूळ ध्येय बाजूला पडते व संघटना चालू ठेवणे हेच ध्येय होऊन बसते. त्या सगळ्यात आपण अडकून पडू नये, आजवरच्या आंदोलनात अशा लिखित घटनेच्या ढाच्याविना आपले काही अडलेले नाही; पुढे योग्य वेळ

राष्ट्रीय मंचावर जाताना३६१