पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आहे असे ते म्हणतात.
 रासायानिक कीटकनाशकांमुळे निसर्गावर किती विपरीत परिणाम होत आहे, याकडे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या Silent Spring ह्या राशेल कार्सन या अमेरिकन महिलेच्या पुस्तकाचाही परिचय जोशी करून देतात. जगभरच्या पर्यावरणवाद्यांचे हे अतिशय लाडके पुस्तक, रसायनांच्या वापरामुळे उत्पादन वाढले, पण त्याचबरोबर डीडीटी अथवा एंड्रिनसारख्या रसायनांमुळे कोट्यवधी मासेही मरतात, पर्यावरणाची अपरिमित हानी होते, याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम या पुस्तकाने केले. तिचे म्हणणे चुकीचे आहे असे जोशी म्हणत नाहीत, पण अशा औषधांचे फायदेही त्यांना दिसतात. ते म्हणतात,

या औषधांचा वापर झाला नसता तर साथीचे रोग आटोक्यात आले नसते, त्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले असते; कीटकनाशकामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले, अन्यथा लक्षावधी माणसे भुकेने तडफडून मेली असती; रसायनांच्या वापराचे दुष्परिणाम आहेत हे खरे, पण रसायने वापरलीच नसती तर निसर्ग मोठा स्वच्छ, सुंदर राहिला असता हेही खरे नाही. मनुष्यप्राणी पर्यावरणाच्या नवनव्या समस्या उभ्या करीत जाईल आणि हळूहळू त्यांचे निराकरणही करीत जाईल.


 पुस्तकातला शेवटचा लेख रोझा लुक्झेम्बर्ग या पोलंडमधील साम्यवादी महिलानेत्यावर आहे; तिने मार्क्सवादातील एक महत्त्वाची त्रुटी दाखवून देणारा तिसऱ्या जगाच्या शोषणाचा सिद्धांत मांडला होता. विकसित जगातले कामगार आणि व्यवस्थापन हे दोघेही खरे तर पुढे एकत्रच येतात, वर्गयुद्ध वगैरे त्यांच्यात प्रत्यक्षात काहीच होत नाही; कारण दोघे मिळून गरीब वसाहतींचे शोषण करत असतात व त्यावर दोघेही समृद्ध होत असतात! इंपिरिअ‍ॅलिझम (साम्राज्यवाद) हा शब्दही तिनेच प्रथम वापरला. १५ जानेवारी १९१९ रोजी सरकारनेच तिच्यावर मारेकरी घातले, तिच्याच घरातून तिला फरफटत बाहेर काढले, लाठ्यांनी झोडपलेआणि नंतर बंदुकीची गोळी झाडून तिचे प्रेत जवळच्या एका कालव्यात फेकून दिले. तब्बल पाच महिन्यांनी पूर्ण सडलेल्या अवस्थेत ते सापडले. तिची क्रांतिकारक मांडणी आणि ज्या धाडसाने तिने ती केली त्याचे जोशींना विलक्षण कौतुक आहे. लेखाच्या, व या पुस्तकाच्या, शेवटी जोशी लिहितात,

शेतकरी संघटनेने भारतीय शेतीच्या पराधीनतेचे विश्लेषण करताना 'इंडिया' विरुद्ध 'भारत' असा संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्या मांडणीचा मूळ प्रेरणास्रोत रोझा लुक्झेम्बर्गच आहे.


 आश्चर्य म्हणजे जोशींवर ज्या लेखिकेचा सर्वाधिक प्रभाव आहे, त्या मूळच्या रशियन पण तरुणपणीच अमेरिकेत स्थायिक झालेल्या आयन रँड हिच्या;; We the Living. The Fountainhead, Atlas Shrugged किंवा The Virtue of Selfishness यांसारख्या एखाद्या पुस्तकाचा मात्र त्यात परिचय नाही. तिने प्रसृत केलेल्या Objectivism या


                                             साहित्य आणि विचार - ४४३