पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रख्यात कादंबरी त्यांनी शाळेत असतानाच वाचली होती. १६०५ साली लिहिली गेलेली ही कादंबरी स्पॅनिश भाषेतील सर्वश्रेष्ठ आणि एकूणच जगातील सर्वश्रेष्ठ अशा दहा कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते. डॉन क्विझोटी हा या कादंबरीतील नायक. अत्यंत जुलमी, पण काल्पनिक, अशा अतिप्रबळ शत्रूशी हे पात्र सतत झगडत असते. आपण कोणीतरी महान शक्तिशाली आहोत आणि जगातल्या सर्वांवरील अन्याय आपण दूर करणार आहोत अशी त्याची स्वतःविषयी खात्री असते. जोशींची आई कधी कधी त्यांना डॉन क्विझोटी म्हणायची!
 या वाचनाचा प्रत्यक्ष जीवनाशी संदर्भ जोशी कसा लावतात ते बघण्यासारखे आहे. एके ठिकाणी ते लिहितात,

सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक डॉन क्विझोटी लपलेला असतो, एक स्वप्नरंजन असते, प्रत्यक्षात न जमलेले भव्यदिव्य असे काहीतरी आपण करत असतो अशी छुपी आत्मवंचना असते. वेळोवेळी असे अनेक डॉन क्विझोटी माझ्या स्वतःच्या मनामध्येही निर्माण झालेले आहेत. कधी कधी मी स्वतःला सॉमरसेट मॉमच्या The Moon and Six Pence या कादंबरीतील स्टॉकब्रोकर नायकाच्या जागी कल्पिलेले आहे, तर कधी कधी मी स्वतःला एखाद्या आध्यात्मिक प्रेषिताच्या जागी कल्पिलेले आहे. या सगळ्या अनुभवांतून मी स्वतः गेलेलो असल्याकारणाने स्वयंस्फूर्त क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधील डॉन क्विझोटी मला लगेच ओळखू येतो.

(बस करा हे समाजसेवेचे ढोंग!, अंतर्नाद, दिवाळी १९९९)

 आपण केलेल्या वाचनाच्या प्रकाशात भोवतालच्या वास्तवाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायची ही विशिष्ट दृष्टी हे त्यांच्या प्रगल्भ अशा विचारशक्तीचे द्योतक आहे. ज्याला वाचनाची आवड आहे आणि ज्याच्यापाशी थोडेफार भाषाप्रभुत्व आहे, त्याला केव्हा ना केव्हा स्वतःही लिहावेसे वाटणे तसे स्वाभाविक असते. जोशींनीही कुमारवयातच कथालेखन करायला थोडीफार सुरुवात केली होती व त्यांच्या एका कथेबद्दल पहिल्या प्रकरणात लिहिलेच आहे. पण पुढील आयुष्यात ते मराठी साहित्यापासून काहीसे दूर गेले. विशेषतः शेतकरी आंदोलन सुरू झाल्यावर. म्हणजे एकीकडे त्यांनी साहित्यावर खूप प्रेमही केले व दुसरीकडे त्यांनी वेळोवेळी साहित्य हे तसे अनुपयुक्त आहे, असेही म्हटले आहे.

 जोशींनी आपले विचार एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात मांडले पाहिजेत असा अरविंद वामन कुळकर्णी व सुरेशचंद्र म्हात्रे या दोघांचा खूप आग्रह होता. स्वतः जोशी मात्र अशा लेखनाबद्दल उदासीन होते. शेतकरी आंदोलनाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी जोशींचा भर त्यांच्या भाषणांवरच होता. 'वारकरी' होते; पण केवळ संघटनेच्या बातम्या इतरांना कळाव्यात म्हणून. 'शेतकरीवर्ग हा काही वाचणारा वर्ग नाही व त्यामुळे आपल्या विचारांचा प्रसार लेखनातून फारसा होणार नाही, भाषणे हेच खरे आपले हत्यार' असे त्यांना वाटत असे.

४३४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा