पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

किंवा मुलायमसिंग यादव, शरद पवार किंवा करुणानिधी, मायावती किंवा ममता, जयललिता किंवा सोनिया यांच्या सर्वांच्याच पक्षात त्यांचाच शब्द पाळला जातो असे दिसेल. स्वयंसेवी संस्थांतही काही वेगळी परिस्थिती दिसत नाही. अंतर्गत लोकशाही हा संस्थात्मक जीवनाचा एक आदर्श आहे, पण ते वास्तव नव्हे - निदान भारतात तरी. मुळात शेतकरी संघटना छोटीच राहिली व त्यामुळे एककेंद्री राहू शकली; तिचा जर अनेकांगी विस्तार झाला असता तर कदाचित विकेंद्रीकरण अपरिहार्य ठरले असते, निदान अधिक शक्य झाले असते.
 'शरद जोशींना संघटना चालवायची नव्हती, तर त्यांनी स्वतः बाजूला व्हायचे होते व आम्हाला संघटना चालवायला द्यायला हवी होती,' असाही एक आरोप केला गेला आहे. वस्तुस्थिती काय होती?
 मुळात शेतकरी संघटना ही जोशींचीच निर्मिती होती; तिचा वैचारिक पाया म्हणजे त्यांची स्वतःचीच जीवनधारणा होती. तिच्याबरोबरचे त्यांचे तादात्म्य संपूर्ण होते. ती संस्था मुख्यतः वस्तुरूप नसून विचाररूप होती. अशी संस्था त्या संस्थापकाने दुसऱ्या कोणाच्या हाती सोपवणे हे बोलायला सोपे वाटले, तरी प्रत्यक्षात तितके सोपे नाही. ती आपल्या अपत्याकडे जावी (तेही आपल्या पश्चात, आपल्या हयातीत नाही!) अशी तजवीज करता येते, केलीही जाते; पण अन्य कोणावर ती स्वनिर्मित संस्था सोपवणे अवघड असते. आपल्याकडे संघटनेचे नेतृत्व सोपवावे अशी ज्यांची इच्छा होती आणि ती आपण चांगल्या प्रकारे चालवू शकू अशी ज्यांना खात्री होती, त्यांच्या निष्ठेबद्दल आणि कुवतीबद्दल तेवढा विश्वास जोशींना होता का? तसा असल्याशिवाय संघटनेची सूत्रे जोशी त्यांच्या हाती कशी सुपूर्द करू शकले असते? नेतृत्व हे मागून मिळत नाही; कर्तृत्वाने मिळवावे लागते; किंवा मग स्वतःची स्वतंत्र संघटना काढून ते नव्याने प्रस्थापित करावे लागते.
 शेतकरी संघटनेच्या संदर्भात अगदी सुरुवातीचा विचार केला, तरी काही बाबतीत जोशींची भूमिका स्पष्ट होती हे जाणवते. एक म्हणजे ते स्वतःला स्वतंत्रतेच्या मार्गावरील एक यात्रिक समजत असत; या यात्रेला शेवट नाही, कारण स्वतंत्रता ही एक दिशा आहे, ते काही गंतव्य स्थान नाही असे ते मानत. 'योद्धा शेतकरी'मध्ये जोशींनी म्हटले आहे,
 "मी आज जो शेतकरी संघटनेचा विचार मांडतोय त्याला फक्त पंधरा-वीस वर्षं इतकंच महत्त्व आहे. कुणी जर म्हटलं, की हा विचार कालातीत आहे, त्याचा एक धर्म झाला पाहिजे, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे! आज जर संघटना तयार झाली, यशस्वी ठरली तर पंधरा वर्षांनी ह्या संघटनेला करण्यासारखं कार्यच उरणार नाही! त्यामुळे संघटनेला अस्तित्वात असण्याचा अधिकारच असणार नाही!" (पृष्ठ ४९)
 हे ऊस आंदोलनाच्या वेळचे, म्हणजे साधारण १९८० सालातले उद्गार आहेत. आपण हाती घेतलेले हे शेतीमालाच्या भावाचे उद्दिष्ट आयुष्यभरासाठी आहे, असे त्यावेळी त्यांना नक्कीच वाटत नव्हते.
 अ. वा. कुळकर्णी यांनी एक आठवण लिहिली आहे. ३० मे १९८२ रोजी इंडियन
४०४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा