पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'काळाच्या ओघात अशी काही माणसं दुरावली. काहींना मुळातच मोठी महत्त्वाकांक्षा होती. ही मंडळी तशी कर्तबगारही होती. शेतकरी संघटनेत मात्र त्यांना देण्यासाठी माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं. इतर राजकीय पक्षांनी थोडंफार आमिष दाखवल्यावर ही मंडळी तिकडे गेली. शंकर धोंडगे,पाशा पटेल, अनिल गोटे वगैरे. आज विचार करताना वाटतं, को ही माणसं दुसरीकडे गेली, आमदार वगैरे झाली हे चांगलंच झालं. विचार तर ते संघटनेचाच मांडतात की. काही जणांनी व्यक्तिगत आर्थिक गरजांमुळे वेगळा रस्ता धरला. उदाहरणार्थ, आमच्यातल्या अशोक गायकवाडने चळवळ सोडली, पण स्वतःची उत्तम शेती विकसित केली. बद्री देवकरने शेती सोडून ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. प्रकाश पाटील जळगावहून औरंगाबादला आला आणि चांगला सरकारी वकील बनला. अशी मंडळी चळवळीतून बाहेर पडली, पण स्वतः चांगली प्रस्थापित झाली व याचा मला आनंदच आहे.
 'आणखी एक काहीशा प्रस्थापित नेत्यांचा वर्ग होता, ज्यांना माझ्याबरोबर काम करायची इच्छा होती. तसं ते माझ्याशी बोललेही होते. पण काही दिवसांनी त्यांच्याच लक्षात आलं असावं, की त्यांना साजेसं, किंवा महत्त्वाचं असं काही काम मी त्यांना देऊ शकत नाही. संघटनेत तसा वावही नव्हता. आणि नुसतं कार्यकर्ता बनण्यात साहजिकच त्यांना स्वारस्य नव्हतं. नाशिकचे विनायकराव पाटील किंवा नगरचे गोविंदराव आदिक यांचा समावेश मी अशा मंडळींमध्ये करेन.
 'दर्दैवाने काही मंडळी मात्र व्यक्तिशः माझ्याबद्दल कटुता बाळगून वेगळी झाली. त्याबद्दल मात्र मला खरंच खूप दुःख होतं. माझ्या हातून कदाचित काही चुकलं असेल. मी स्वतः त्यांच्यातल्या अनेकांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून त्यांची क्षमा मागितली आहे आणि त्यांनी पुन्हा संघटनेत यावं असं जाहीर सभांमधूनही सांगितलं आहे.'
 श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सव सत्कारसमारंभातील जोशींचे भाषण त्या दृष्टीने पुरेसे बोलके आहे. त्यावेळी जोशी म्हणाले होते,

तुमच्यापैकी कोणाच्या मनात असं असेल, की शेतकरी संघटनेत तुम्हाला योग्य तो मान मिळाला नाही, किंवा तुम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली गेली, तर श्रीरंगनानांच्या साक्षीने मी कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी चूक मानतो, तुमची माफी मागतो आणि 'परत या' अशी हाक देतो.... श्रीरंगनानांनी कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता त्यांची 'शेतकरी-शेतमजूर संघटना' पिंपळगाव-बसवंतच्या १९८०च्या सभेत शेतकरी संघटनेत मिसळून टाकली, आपलं नाव ठेवण्याचाही आग्रह त्यांनी धरला नाही. त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुमच्या मनात प्रामाणिकपणे शेतकऱ्यांविषयी तळमळ असेल, तर केवळ काही रुसवेफुगवे झाले म्हणून दूर राहू नका. शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या चुली करू नका.

(६ जानेवारी २००९, बळीचे राज्य येणार आहे., पृष्ठ २५४)


  लिप्ट्न ते स्वातंत्र्यवाद : शरद जोशींचे ऐतिहासिक योगदान व मर्यादा या आपल्या लेखात (मोहन गुंजाळ स्मृतिग्रंथ, नोव्हेंबर २०११) मिलिंद मुरूगकर यांनी 'शरद जोशींची

                                                                         ४०० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा