पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा पक्षाला पाठिंबा द्यायचा आणि नंतर त्या पक्षाने शेतकरीहिताची धोरणे आखावीत यासाठी त्या पक्षावर दडपण आणत राहायचे. इंदिरा काँग्रेस आता स्वबळावर व मोठ्या बहुमताने सत्तेवर आल्यामुळे त्या पक्षावर बाहेरून फारसा दबाव आणणे शक्य नव्हते, म्हणून मग भविष्यात दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाला सत्तेवर आणायचे; जो अल्पमतातील पक्ष असल्याने आपल्या दबावाखाली योग्य धोरणे आखू शकेल. तसे सगळेच पक्ष शेतकरीविरोधात आहेत. पण इंदिरा काँग्रेस हा पक्ष अगदी आपल्या छाताडावरच बसलेला आहे; त्यामुळे दुसऱ्या कुठल्यातरी छोट्या पक्षाला हाताशी धरून इंदिरा काँग्रेसला आधी दूर करायचे; आणि मग त्या दुसऱ्या पक्षावर दबाव आणत राहायचे. म्हणजेच, मोठ्या चोराला दूर करण्यासाठी आधी छोट्या चोराची मदत घ्यायची व मग त्या छोट्या चोरालाही सरळ करायचे; अशी काहीशी जोशींची रणनीती होती. त्यांनी तिला 'दुहेरी कोलांटी उडी' असेही म्हटले होते.  पुढल्या एक-दोन वर्षांत ही रणनीती अधिकाधिक स्पष्ट होत गेली व त्यातून शेतकरी संघटनेची एकूण राजकारणविषयक भूमिकाही पक्की होत गेली. बऱ्याच वर्षांनी जोशींनी ती भूमिका पुढील पाच सूत्रांमध्ये मांडली होती :
१. संघटनेचा हेतू राज्यसत्ता मिळवणे हा नाही; कारण राज्यसत्तेवर गेलेली शेतकऱ्यांची मुलेसुद्धा शेतकऱ्यांची राहत नाहीत.
२. शेतकऱ्यांचे शोषण हे आजच्या व्यवस्थेचे सूत्र आहे. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी हे सूत्र बदलणार नाही. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळेच पक्ष सारखेच चोर आहेत.
३. शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव हा संघटित ताकदीच्या आधारानेच मिळू शकेल, निवडणुकांनी नाही. परंतु, निवडणुकांचा उपयोग आंदोलनाची ताकद वाढवण्याकरिता केला पाहिजे. हा उपयोग कसा करता येईल यासंबंधी वेगवेगळे धोरण प्रत्येक निवडणुकीच्या आधी स्वतंत्रपणे ठरवावे लागेल.
४. गुणवत्तेच्या आधाराने कोणत्याही पक्षाविषयी फार काळ मैत्रीची भावना असणे संभवतच नाही. पण अंकगणिती हिशेबाने परिस्थितीनुरूप संघटनेस वेगवेगळ्या पक्षांशी 'छोटा चोर, मोठा चोर' या हिशेबाने संबंध ठेवावे लागतील आणि शेतकरीविरोधी पक्षांमध्ये कोणी एक फार बळजोर होत नाही याची काळजी घ्यावी लागेल.
५. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पूर्ण वेळ सत्तेवर असलेला इंदिरा काँग्रेस पक्ष हा शत्रू क्रमांक एक खरा, पण जातीयवादी पक्ष- मग ते भगवे, हिरवे, निळे, पिवळे, कोणत्याही रंगाचे असोत – हे केवळ महाराक्षस आहेत.

(शेतकरी संघटक, ६ नोव्हेंबर, १९९४)


राजकारणाच्या पटावर३२३