पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागा काबीज केल्या व तो देशातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला. या ४५ खासदारांपैकी आठ माजी संस्थानिक होते, तीन निवृत्त सनदी अधिकारी होते व तब्बल ३४ हे स्वतः ग्रामीण भागात राहणारे शेतकरी होते, हे नमूद करायला हवे. त्यांच्याविरुद्ध केला गेलेला प्रचार किती खोटा होता हे ह्यावरून सिद्ध होते.
 दुर्दैवाने त्यानंतर पाचच वर्षांनी, २५ डिसेंबर १९७२ रोजी, वयाच्या ९४व्या वर्षी राजाजींचे निधन झाले. पुढे त्या पक्षाला उतरती कळा लागली व मिन मसानी स्वतःही नव्वदीच्या घरात गेल्यावर आजारपणामुळे सक्रिय राहू शकले नाहीत व त्यामुळे तो पक्ष १९९०नंतर जवळजवळ नामशेषच झाला होता. त्या पक्षाची सद्यःस्थिती काय आहे याची चौकशी करायची जोशींनी आपले एक सहकारी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांना विनंती केली.
 Freedom First या मिनू मसानी यांनी सुरू केलेल्या साप्ताहिकाचे त्यांच्या पश्चातचे संपादक एस. व्ही. राजू यांनी जोशींवरील एका लेखात म्हटले आहे,

१९९३ साली, एका रविवारी सकाळी, शेतकरी संघटनेचे एक तत्कालीन आमदार व विधानसभेचे उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे मुंबईत मला भेटायला आले. स्वतंत्र पक्ष अजून अस्तित्वात आहे का, याची ते चौकशी करत होते. 'आहे, पण अगदी नाममात्र' असे मी त्यांना सांगितले.
त्यानंतर आठवड्याभराने मी स्वतःच पुढाकार घेऊन आंबेठाणला जाऊन शरद जोशींना भेटलो. तसा पूर्वी एकदा मी त्यांना भेटलो होतो. आमच्या लेस्ली सॉनी प्रोग्रॅम फॉर ट्रेनिंग इन डेमोक्रसी ह्या संस्थेच्या एका कार्यक्रमात. १५ मार्च १९८७ रोजी. त्यावेळच्या त्यांच्या भाषणाने मी खूप प्रभावित झालो होतो. त्यानंतरही मी त्यांच्याविषयी ऐकत असे, पण भेटीचा योग असा दरम्यानच्या काळात आला नव्हता. पुढे अर्थात आम्ही अनेकदा भेटलो आणि त्यांचे विचार मला अतिशय मोलाचे असे वाटले.
आमच्या पक्षाची म्हणून जी मूल्ये आहेत ती सगळी त्यांच्यात आहेत. त्यांच्यात आणखी एक खासियत आहे. उदारमतवादी (लिबरल) नेत्यांमध्ये मास अपील हा गुण अत्यंत दुर्मिळ आहे. आमच्या पक्षात अनेक नामांकित भारतीय होते, पण ज्याला मास अपील आहे, असे कोणीच नव्हते. अगदी राजाजी किंवा मसानी हेदेखील बहजनसमाजात तसे लोकप्रिय नव्हते. त्यांच्यापैकी कोणाच्याच सभांना लाखालाखांनी माणसे कधीच जमत नसत.

(चतुरंग स्मरणिका, २०१२, पृष्ठ ८०-१)


२८ मे १९९४ रोजी मुंबईतील भारतीय विद्या भवनात झालेल्या एका कार्यकर्त्यांच्या सभेत जोशींनी स्वतंत्र भारत पक्षाविषयीची आपली भूमिका मांडताना केलेल्या भाषणात त्यांच्या स्वतःच्या एकूण जीवनविषयक चिंतनाचे उत्तम प्रतिबिंब उमटले आहे. शेतकरी


४२६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा