पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पद्धत होती. आई दर सोमवारी किंवा एकादशीच्या दिवशी शिवलीलामृताचा एखादा पाठ वाचायची. यातून पाठांतर वाढले, उच्चार शुद्ध झाले, वाचनाची गोडी निर्माण झाली. एखादी गोष्ट नेमाने, नियमितपणे करण्याचे महत्त्व अंगी बाणले. ते म्हणतात.
  "अभ्यास, वाचन, पाठांतर करणे यात काहीतरी फायद्याचे आहे, अशी जाणीव एक ब्राह्मण मुलगा म्हणून माझ्या मनामध्ये तयार झाली. त्याचा मला जो फायदा मिळाला, तो मागासवर्गातल्या एखाद्या श्रीमंत विद्यार्थ्यालासुद्धा मिळणे शक्य नव्हते."
 ह्या जाणिवेमुळे जातिधर्मनिरपेक्ष राहूनही अन्य काही पुरोगाम्यांप्रमाणे त्यांनी धार्मिक परंपरांची कुचेष्टादेखील कधी केली नाही; ह्या परंपरेतूनही आपल्याला काहीतरी उपयुक्त मिळाले आहे व इतरांनाही तसे मिळू शकते याची त्यांना जाणीव होती.
 स्थानिक अस्मिता कुरवाळण्याच्या या काळातही त्यांनी कुठल्याही प्रकारचा जातीय, धार्मिक, प्रांतिक वा भाषिक अभिनिवेश बाळगला नाही. अशा अभिनिवेशांतून भारतीय जनतेत नेहमीच पद्धतशीररीत्या फूट पाडली गेली आहे. जोशी म्हणतात,

 जाती, भाषा, धर्माचे क्षुद्र वाद हे देशाची विकासाची गती खुंटल्यामुळे निर्माण होतात. ओढ्याला तुंबारा पडला, की शेवाळे माजते, किड्यांची वळवळ, हाणामारी सुरू होते. किड्याकिड्यांतील वाद सोडवू म्हटल्यास सुटणार नाहीत. किंबहुना ते वाद वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होतो. विकासाचा खुंटलेला मार्ग खुला करणे, तुंबारा काढणे हा क्षुद्रवाद संपवण्याचा एकच रस्ता आहे.
 देशातली गरिबी हटली, देशातील सर्व घटकांचा विकास होत राहिला तर यांपैकी एकही भांडण होणार नाही. आपल्या देशातले एखादे राज्य म्हणते, की आम्हांला फुटून जायचे आहे. अमेरिकेतले एखादे संस्थान असे म्हणते का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसे आहेत; अनेक राष्ट्रांतून आलेली आहेत, पण तिथे असे कुणी म्हणत नाही. उलट, अमेरिकेतील संस्थान असणे ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही, कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही.

                    (समाजसेवेची दुकानदारी नको! अंतर्नाद, फेब्रुवारी २००७) 

 स्थानिक अस्मितेशी निगडित कुठलाच अभिनिवेश जोशींमध्ये अजिबात नव्हता. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे संस्थापक मनोहर आपटे यांच्यावर 'अंगारमळा मध्ये लिहिलेल्या लेखात ते शेवटी म्हणतात,

असल्या लोकविलक्षण प्रज्ञावंताच्या मनात स्वदेश, महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संत यांच्याबद्दल अतिरेकी म्हणावा इतका जिव्हाळा होता. या कोणत्याच गोष्टीबद्दल मला फारशी कदर नाही. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पसायदान म्हटले जाते आणि त्यावेळी सर्व सभा उठून उभी राहते हे मला हास्यास्पद वाटते.


४५४ । अंगारवाटा... शोध शरद जोशींचा