पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अडचणींमुळे अर्थार्जन करणे आवश्यक होते असे बहुसंख्य कार्यकर्ते हळूहळू आंदोलनातून काढता पाय घेऊ लागले. निवडणुकीतील यशातून हे सारे पालटले असते.
 राजकीय सत्ता मिळाली असती तर इतरही अनेक फायदे झाले असते यात शंकाच नाही. राजकीय सत्तेबरोबर शेकडो लोकांना उपकृत करायची एक मोठी संधी प्राप्त होते. असंख्य समित्या असतात, महामंडळे असतात, पदे असतात, विदेश दौरे असतात; कोणाला साखर कारखाना दे, कोणाला कॉलेज काढू दे, कोणाला दूध महासंघ दे, अनुदाने दे, सदनिका वा भूखंड दे, सरकारी कंत्राटे दे; अशा अगणित मार्गांनी एक लाभार्थीचा गोतावळा (system of patronage) तयार करता येतो. प्रचंड आर्थिक बळ लाभते. पैशाकडे पैसा जातो या न्यायाने ते वाढतच जाते. सत्तेचा उपयोग करून माध्यमांशी चांगला संपर्क ठेवता येतो; आपली जनमानसातील प्रतिमाही जोपासता येते. सत्ताधीशांची उपद्रवक्षमतादेखील भरपूर असते. या साऱ्यातून सर्वोच्च नेत्याची सत्ता अधिकाधिक बळकट होतेच, पण इतरही अनेकांना नेता बनायची संधी मिळते. 'लोकांची सेवा करायची तर सत्ता ही हवीच,' असे स्वतः लोकनेता असलेले यशवंतराव चव्हाणही म्हणत.
 ही राजकीय सत्ता, त्यातून तयार होणारी आर्थिक हितसंबंध जोपासणारी यंत्रणा, कार्यकर्त्यांना आत्मविकासासाठी व अधिकाधिक मोठे बनण्यासाठी मिळणारा वाव, त्यातून त्यांना लाभणारे बळ, अशा बलिष्ठ कार्यकर्त्यांची व नेत्यांची दुसऱ्या फळीतील साखळी आणि त्यांतून साधले जाणारे सर्वोच्च सत्तेचे सातत्य यांपासून शेतकरी संघटना कायम वंचित राहिली.
 जेव्हा तुम्ही दुसऱ्याला काही देऊ शकता, तेव्हा तुम्हांला काहीतरी मिळायची शक्यताही दुणावते. एखादी मोठी संस्था किंवा व्यवसाय किंवा राजकीय सत्ता हाती असेल तर इतरांना देण्यासारखे बरेच काही तुमच्यापाशी असते; जे जोशींपाशी अजिबातच नव्हते.

 शेतीमालाला वाजवी दाम ह्या एक-कलमी कार्यक्रमावर सर्व लक्ष केंद्रित केल्यामुळे इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे जोशींचे फारसे लक्ष गेले नाही अशी काहीशी टीका त्यांच्यावर केली गेलेली आहे.
 उदाहरणार्थ, अगदी सुरुवातीला त्यांनी शेतीला सुरुवात केली तेव्हा त्या संपूर्ण परिसरात गुरांचा डॉक्टर एकही नव्हता. शेतीच्या दृष्टीने ती मोठी गंभीर समस्याच होती. कारण त्यामुळे औषधाविना गुरे मरायचे प्रमाण तिथे भरपूर होते. शिवाय त्या काळात देशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली संकरित गाईंची पैदास आंबेठाण परिसरात फारशी होत नव्हती. त्यामुळे दूधसंघ उभे राहणे वगैरे प्रकार दूरच होते. जेमतेम घरातील मुलांच्या वाट्याला येईल इतकेच दूध उपलब्ध असे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या उरळीकांचन येथील मणिभाई देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांचे या क्षेत्रातील काम देशभर वाखाणले जात होते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती या जोडधंद्यामुळे सुधारत होती. ज्या देशी गाई सरासरी एक-दोन लिटरपेक्षा जास्त दूध कधीच देत नव्हत्या, त्या विदेशी वळूशी संकर केल्यावर सरासरी वीस-बावीस लिटर दूध सर्रास देत होत्या. ही सारी परिस्थिती जोशींना नक्कीच माहीत असली पाहिजे. अशी


४८२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा