पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बनवायचे काम जोशींनी पुण्याचे नितीन भोसले यांच्यावर सोपवले होते व त्यानुसार त्यांनी 'जय विदर्भ' हा सुमारे ३५ मिनिटांचा चित्रपट बनवला. त्यात शरद जोशी, प्रकाश आंबेडकर वगैरेंच्या मुलाखतीही होत्या. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पाच-सहाशे प्रती काढल्या आणि विदर्भात जागोजागी तो चित्रपट दाखवला गेला. जनमतावर त्याचाही बराच प्रभाव पडला. एरव्ही विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, पण त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील अकरा जागांपैकी दहा जागांवर काँग्रेस उमेदवार पराभूत झाले होते. यामागे शेतकरी संघटनेने केलेला प्रचार मुख्यतः कारणीभूत होता.
 वामनराव चटप यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. १९९०प्रमाणे १९९५मधेही ते आमदार म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून निवडून गेले होते. २१ एप्रिल १९९८ रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनात त्या वर्षीचे 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते खास पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांचा स्वतंत्र भारत पक्ष इतका छोटा असूनही त्यांना असे गौरवण्यात आले हे विशेष आहे. व्यवसायाने वामनराव एक वकील. शेरोशायरीची प्रचंड आवड, ओजस्वी वक्ते. सामाजिक कामाचा प्रथमपासून ध्यास. शेवटपर्यंत त्यांनी जोशींना साथ दिली. संघटनेच्या कामासाठी सतत प्रवास करावा लागत असूनही त्यांनी आपला मतदारसंघ कष्टपूर्वक जोपासला. आज संघटनेच्या इतर कुठल्याही नेत्यापेक्षा त्यांना अधिक जनाधार आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. आजही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ते अहोरात्र प्रचार करत असतात. अर्थात तसे करताना ते शेतकरी संघटनेचेच विचार लोकांपुढे मांडत असतात.

 परंतु निवडणुकींच्या संदर्भात विचार करताना त्या साऱ्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा मात्र शिवसेनेला मिळाला असे दिसते. १९८० पूर्वी शिवसेना मुख्यतः मुंबई व ठाणे या भागात सीमित होती व स्थानिक मराठी माणसांच्या हितासाठी लढणारी संघटना' हीच तिची प्रतिमा होती. त्यानंतर तिचे क्षेत्र विदर्भ व मराठवाड्यात विस्तारत गेले. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामळे व सहकारी साखर कारखानदारीमुळे काँग्रेसचा पगडा कायम राहिला होता, पण विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरल्यामुळे एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती व तिचा फायदा शिवसेनेच्या विस्ताराला झाला. शिवसेनेने सगळीकडेच स्थानिक अस्मितेचे राजकारण केले; मराठवाड्यात तिने सवर्णांची अस्मिता जोपासली तर विदर्भात मराठीपणाची. मुख्यतः आर्थिक मुद्द्यांवर उभ्या असलेल्या शेतकरी संघटनेपेक्षा हे अस्मितेचे मुद्दे मतदारांना अधिक आकर्षक वाटले. 'गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर येणारी लढाऊ संघटना' ही सेनेची प्रतिमा तरुणांना भावली. शेतकरी संघटनेने तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी बाळासाहेबांनी आपल्याकडे खेचून घेतली. त्यातूनच राजकीय यश शिवसेनेच्या पदरात पडत गेले. 'राजकीय शेतीची सगळी मशागत शेतकरी संघटनेने केली आणि पीक मात्र शिवसेनेने कापले' हे एका निरीक्षकाचे विधान सार्थ वाटते.

 काही आकडे पुरेसे बोलके आहेत. राज्य विधानसभेच्या निवडणुकांत १९८५ मध्ये

३३८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा