पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेले होते. म्हसवडहून लोणंदच्या बाजारात आम्ही एक ट्रक कांदा नेला. बाजारात कांद्याला फक्त तीन पैसे किलो भाव मिळाला! ह्या भावात तर ट्रकचे भाडेही निघत नव्हते! एवढ्या कमी किमतीत हा कांदा विकण्यापेक्षा तो परत घरी घेऊन जायचे आम्ही ठरवले. तो अक्षरशः उकिरड्यात टाकून दिला. म्हटले, निदान त्याचे खत तरी तयार होईल. खरे तर, माहेरची मी व्यापारी कुटंबातली; पण शेतीचा हिशेब मला चक्रावून टाकणारा होता. शेती कायम तोट्यात का असते याचे शरद जोशींचे विश्लेषण मला तेव्हा पटले.
 "त्यानंतर मी चांदवडच्या महिला अधिवेशनाला हजर राहिले. तिथे मी जे पाहिले ते पूर्वी कुठे बघितले नव्हते. शरद जोशींच्या केवळ हाकेवर लाखोंच्या संख्येने तिथे महिला आल्या होत्या. त्यातूनच पुढे लक्ष्मीमुक्ती अभियान सुरू झाले. त्यातही मी सहभागी झाले. जोशींची ती कल्पनाच अगदी विलक्षण होती. जोशींची सीताशेतीची व माजघरशेतीची कल्पनाही आगळीवेगळी होती. ते म्हणत, 'विमानात मिळणाऱ्या पोटॅटो चिप्सपेक्षा आणि स्नॅक्सपेक्षा शेतकरी महिलांचे सांडगे आणि खारवडे खूप सरस आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करून त्यात नावीन्य आणि वैविध्य आणायचे काम शेतकरी महिलाच करू शकतील. विपरीत परिस्थितीतदेखील शेतकरी टिकू शकला याचे श्रेयही शेतकरी महिलेच्या चिकाटीला आहे.'
 "सीताशेती ही खरी प्रयोगशेती होती व त्या संकल्पनेपासून मीही खूप प्रेरणा घेतली. वेगवेगळे प्रयोग करू लागले. आमचा सगळा दुष्काळी तालुका. इथे शेळ्या पाळायचे प्रयोग मी केले. पण कुठले पीकच येत नाही, तर शेळ्या खाणार काय? जोशी म्हणाले, 'शेळ्या आपला मार्ग स्वतःच शोधतात. मग माझ्या लक्षात आले, की शेळ्या निवडुंग खातात व तो आमच्या भागात येऊ शकतो. मग मी निवडुंगाची शेती करू लागले व त्यात मला खूप आनंद वाटायचा. जोशींमधील ही प्रयोगशीलता मला खूप भावायची.
 "दुर्दैवाची गोष्ट ही, की शरद जोशी यांना समाजातल्या अभिजनवर्गाकडून अपेक्षित ती मान्यता कधी मिळालीच नाही व ह्यात शेतकऱ्यांबरोबर देशाचेही नुकसान झाले. मिडिया हँडल करणे हीदेखील एक कला आहे आणि त्यात जोशी कुठेतरी कमी पडले की काय, असा प्रश्न मनाला शिवल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांनी जेवढे मोठे कार्य केले, त्या प्रमाणात त्यांचा प्रचार आणि प्रसार कधीच झाला नाही."
 आज म्हसवड येथे चेतना गाला सिन्हा यांनी स्वतःचे मोठे कार्य उभे केले आहे. अल्पबचत गटापासून माण देशी महिला सहकारी बँकेपर्यंत त्याचा मोठा पसारा आहे. ग्रामीण महिलांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्यात उद्योजकता वाढावी म्हणून त्या करत असलेले काम कोणालाही प्रेरणा मिळावी असेच आहे.

 शेतकरी संघटनेच्या लक्ष्मीमुक्ती अभियानातून अवघ्या दोन-तीन वर्षांत खेड्यापाड्यातील दोन लाख स्त्रियांची नावे आयुष्यात प्रथमच सात बाराच्या उताऱ्यावर जमिनीचे सहमालक म्हणून लावली गेली. स्वतः शेतकऱ्याचा आत्मसन्मानही त्यामुळे बळावला; आपण पत्नीच्या कर्जातून मोकळे झालो, तिला न्याय दिला ही भावना त्याला खूप

३०६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा