पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दिल्लीहून प्रकाशित केले.
 "तसा मी अनेकांना भेटलो, पण माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे अशा कुठल्या व्यक्तीचं नाव मला नाही सांगता येणार. किंबहुना कोणामुळेच मी फार भारावून गेलो असं म्हणता येणार नाही. कॉलेजातले प्राचार्य मुरंजन, संस्कृतचे शिक्षक अभ्यंकर, पोस्टातले बॉस वेलणकर, ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे, दुर्गाबाई भागवत, अहमदाबादच्या सेवा या संघटनेच्या इलाबेन भट अशी काही मोजक्या माणसांविषयी मला आदर वाटतो, पण त्या कोणाहीपेक्षा पुस्तकांचा आणि पुस्तकांपेक्षा मी स्वतः केलेल्या विचारांचा व घेतलेल्या अनुभवांचा माझ्यावर जास्त प्रभाव आहे." असे एकदा ते म्हणाले होते.
  पुढे पुढे त्यांच्याबरोबर खोलात जाऊन चर्चा करणे अवघड होत गेले. लगेचच त्यांच्या मेंदूला शीण यायचा; त्यांना फार काळ बसवतही नसे. दोन वेळा आमच्या भेटीची वेळ व चर्चेचा विषय हे आदल्या दिवशी फोनवर ठरलेले असतानासुद्धा तब्येत नरम असल्याने त्यांना झोपूनच राहावे लागले. अर्थात बोलण्यासारखे बहुतेक सारे बोलून झालेही होते. आमच्या औपचारिक मुलाखतवजा भेटी त्यानंतर थांबल्या; त्यानंतरच्या भेटी केवळ त्यांची तब्येत कशी आहे एवढे पाहण्यापुरत्याच झाल्या; संभाषण व्हायचे ते काहीतरी जुजबी स्वरूपाचे.
 कधी कधी आम्ही प्रश्नोत्तरे बाजूला सारून आणि कुठलीही गंभीर चर्चा करण्याऐवजी हलक्याफुलक्या विषयांवरही बोलायचो. एक दिवस अल्फ्रेड हिचकॉकच्या The man who knew too much या गाजलेल्या रहस्यपटातील डोरिस डे हिच्या 'Ke sera sera: Whatever will be, will be; Future's not ours to see; Ke sera sera; What will be, will be.' ह्या प्रसिद्ध गाण्याचे रेकॉर्डिंग मी त्यांना लागोपाठ दोनदा ऐकवले. त्यांना ते गाणे मनापासून आवडत होते. कदाचित त्यांचीही मनोभूमिका त्यावेळी तीच होती. 'के सेरा सेरा हे फ्रेंच आहे बरं का' असे ते दीदींना म्हणाले. 'हा आवाजही डोरिस डेचाच आहे, की आणखी कुणाचा?' याचे कुतूहल त्यांना होते. अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पिकू या चित्रपटाची कहाणी मी त्यांना एकदा ऐकवली होती. हा बहुधा मे २०१५ मधला प्रसंग असेल. त्यांना ती फारच आवडली. 'आपण सगळेच तो बघायला जाऊ या, तुम्ही तिकीटं बुक करून टाका' असे ते अनंतरावांना म्हणालेसुद्धा. दोन दिवस वाट बघून नंतर मी त्यांना आठवणही केली, ते हो, हो' म्हणाले; पण प्रत्यक्षात त्यांचा उत्साह काही तेवढा टिकला नाही. असे खूपदा व्हायचे.
  घरी बसून बसून ते बेचैन होत, सारखे कुठेतरी लांब भटकायला जावे असे वाटे. मोटारीत बसूनच मग ते इकडेतिकडे फिरून यायचे; आंबेठाणलाही जायचे. पुण्याजवळ दिघी इथे एक टेकडीवरचे दत्तमंदिर आहे. चांगला अर्ध्या-पाऊण तासाचा चढ आहे. अनंतरावांचा हात धरून एकदा ते त्या देवळातही जाऊन आले; 'त्याशिवाय माझा आत्मविश्वास वाढणार नाही' ही त्यांची त्या धाडसामागची भूमिका. पावसाळ्यात महाबळेश्वर-पाचगणीच्या एखाद्या हॉटेलात जाऊन त्यांना आठ दिवस राहायचे होते, तेथील एखाद्या चांगल्या हॉटेलची चौकशी करायला त्यांनी मला सांगितले होते व ती करून मी त्यांना सगळी माहिती दिलीही होती. त्याना


सांजपर्व - ४७१