पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौदा-पंधरा वर्षांची व्हायच्या आत लग्न, सासर. लग्नाच्या दिवशी अंगावर फुलं चढतील तीच. त्यानंतर चढायची ती सरणावर ठेवतानाच, सासरी सगळं गोड असलं, तरी कधी हौस नाही, मौज नाही. बाजारात गेली तर दुकानात एखाद्या कपाटात बरी कापडं दिसली, तरी तिथं नजर टिकवायची नाही-उगाच मनात कधी पूरी होऊ न शकणारी इच्छा उभी राहील ह्या भीतीनं. पण आई म्हणून लहानग्याला अंगडं, टोपडं चढवावं, तीट लावावी, काजळ घालावं, बाळाचं आपण कौतुक करावं, त्याच्या बापानंही करावं एवढी साधी इच्छासुद्धा कधी पुरी व्हायची नाही. आणि जर का सासरचं दूध फाटलं व भावाकडे येऊन तुकडे मोडायला लागले तर मग सगळा आनंदच!

(स्त्रियांचा प्रश्न : चांदवडची शिदोरी, पृष्ठ ३-४)


 शेतकरी लेकी-सुनांचे जे चित्रण आपण पुस्तकांतून वाचले असते, सिनेमातून पाहिले असते त्याच्यापेक्षा अगदी वेगळे चित्र इथे जोशी चितारतात. 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी त्या घरची' किंवा 'मै तुलसी तेरे आंगन की' अशा गोंडस व बहुप्रचलित भावनेचा इथे मागमूसही नव्हता.
 त्यानंतर ३१ जुलै, १ व २ ऑगस्ट १९८२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादच्या बैठकीला सर्व कार्यकर्ते सहकुटंब हजर होते; जोशींनी तशी अटच घातली होती. शेतकरी संघटनेची जोडीदारासहची अशी ही पहिलीच बैठक.
 वीस वर्षे शेतकरी संघटनेचे पूर्ण वेळ काम केलेले जोशींचे एक जुने सहकारी व विद्यमान आमदार लातूरचे पाशा पटेल लिहितात,

जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं होतं. बायकोला घेतल्याशिवाय बैठकीला यायचं नाही, असं त्यात स्पष्टपणे कळवलं होतं. माझी बायको तर बुरखा घालायची. लग्न झाल्यावर पहिल्यांदा एवढ्या लांब नेलं. बुरखा घातला, बसमध्ये बसवलं आणि दोन-चार किलोमीटर गेल्यावर बुरखा काढून पिशवीत ठेवला. बैठकीला जेवढी संख्या पुरुषांची, तेवढीच स्त्रियांची. आंदोलन असो, कार्यक्रम असो, सभा असो की मेळावा असो, महिला गोळा कशा करणार? स्वतःची बायको असल्याशिवाय दुसऱ्या कशा येणार? शेतकरी स्त्रियांना घराच्या बाहेर काढून आंदोलनात त्यांनी बरोबरीचा हिस्सा दिला. पहिल्यांदाच कोणी असा चमत्कार केला असेल.

(सकाळ, रविवार, २० डिसेंबर २०१५)


 २२ ऑगस्ट १९८५ रोजी दाभाडी येथे फक्त महिलांचा म्हणून एक मेळावा भरवण्यात आला होता. मेळाव्याचा प्रचार करण्यासाठी संघटनेच्या महिला विभाग प्रमुख मंगला अहिरे,

किसानांच्या बाया आम्ही...२८१