पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कर्जमाफी, आरक्षण असल्या कुबड्यांची आपल्याला गरज नाही; स्वातंत्र्य हेच सर्वाधिक महत्त्वाचे मूल्य आहे यांसारखी अप्रिय मते त्यांनी निर्भयपणे लोकांपुढे मांडली. आपल्या अभिव्यक्तीच्या आड लोकेषणा कधी येऊ दिली नाही आणि जनतेचे लांगूलचालन न करताही जनतेचे प्रेम मिळवता येते, हे दाखवून दिले. विचार स्वच्छ व पक्का असेल आणि लोकमानसात ठसठसणाऱ्या वेदनेला नेमके उत्तर देणारा असेल, तर घराण्यात कुठलीही नेतृत्वाची पार्श्वभूमी नसताना, पाठीशी पैशाचे, जातीचे वा सत्तेचे बळ नसताना, एखादी व्यक्ती लोकशक्ती उभी करू शकते, जुलमी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष उभारू शकते, हा विश्वास त्यांनी समाजात निर्माण केला. शरद जोशी हे कालोचित विचाराच्या ताकदीचे एक जाज्वल्य प्रतीक आहे.
 विशेष महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला, म्हणजेच देशाच्या सर्वांत मोठ्या समाजघटकाला आत्मसन्मान दिला, स्वाभिमान दिला. 'भीक नको, हवे घामाचे दाम' ही अभूतपूर्व घोषणा त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे.

 शरद जोशींनी आम्हांला काय दिले, याची यादी आणखीही वाढवता येईल.
  आम्ही त्यांना काय दिले हा प्रश्न मात्र विचार करायला लावणारा आहे.


सांजपर्व - ४९५