पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण ते लेखन त्यांनी अर्धवटच सोडून दिलेले असल्याने त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही.
 त्यांची स्वतःविषयीची अपेक्षा किती उच्च होती, त्यांच्या स्वप्नांचा आवाका केवढा विशाल होता हे मात्र या पुस्तकाच्या एकूण संकल्पनेतून जाणवते. एक गमतीचा भाग म्हणजे ते ह्या उपरोक्त संकल्पित पुस्तकाबद्दल असेही म्हणाले होते, "या पुस्तकाची अर्पणपत्रिका मी आधीच लिहिली होती व ती खूप वैशिष्ट्यपूर्ण होती – to the one who inspired writing of this book."
 अर्थात ती व्यक्ती कोण होती हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही!
 जगावेगळे असे काहीतरी आपण लिहावे, जे वाचल्यावर 'अरे, इतके सगळे सोपे आहे? मग आपल्याला हे कसे नाही सुचले?' असे वाटून सगळे थक्क होतील अशी काहीतरी सैद्धांतिक मांडणी आपण करावी ही भावना त्यांच्या मनात अगदी पूर्वीपासून असल्याचे जाणवते व ती उतारवयातही कायम असावी. 'इंडिया' विरुद्ध 'भारत' ही त्यांची मांडणी किंवा 'शेतीमालाला रास्त दाम' ह्या एक-कलमी मागणीवरचा त्यांचा भर किंवा माणसाचा निरंतर शोध हा इतर कशाहीपेक्षा स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवण्याचा आहे' हा त्यांचा विचार, हे सारे त्या दृष्टीने सैद्धांतिक व मूलभूत स्वरूपाचेच आहे. आपल्या त्या मतांशी असलेली त्यांची बांधिलकी शेवटपर्यंत होती आणि अशी सूत्रबद्ध वैचारिक मांडणी आपण करू शकलो, याचा त्यांना खूप अभिमानही होता.

 त्यांच्या एका कादंबरीची सुरुवातीची वीस अप्रकाशित हस्तलिखित पाने अनपेक्षितपणे त्यांच्या कागदपत्रांत आढळली. मजकूर इंग्रजीत होता. हा काय प्रकार आहे, म्हणून कुतूहलाने वाचायला लागलो, तो पुरता रंगून गेलो. मराठीप्रमाणे जोशींचे इंग्रजीवरही प्रभुत्व होते. कागद पिवळट आहेत; अनेक वर्षांपूर्वी, नक्की केव्हा ते सांगता येणार नाही, त्यांनी ही कादंबरी लिहायला घेतली असावी.
 कादंबरीच्या पहिल्याच वाक्यात पुढे येते ते फुलो मुदोशी (Phulo Mudoshi) हे एक जगातल्या अनेक देशांत दबदबा असलेले व्यक्तिमत्त्व. Universal Newspapers Distributors Union (UNDU) ह्या एका आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ते असिस्टंट डायरेक्टर जनरल आहेत. पुढच्याच परिच्छेदात फ्लॅशबॅकने फुलो नावाचा एक गरीब मुलगा आपल्यापुढे येतो. कथानक परदेशात कुठेतरी, एका नवस्वतंत्र देशात, घडणारे आहे.
 पहाटेची वेळ आहे. फुलो गाढ झोपला आहे आणि त्याची आई, 'ऊठ बाळ, कामावर जायची वेळ झाली तुझी' म्हणत त्याला उठवत आहे. शाळेत जायच्या आधी घरोघर पेपर टाकायचे काम तो करत असतो. पुढे त्यांच्या देशात सशस्त्र क्रांती होते, लष्कर सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेते.
 लष्कराविरुद्ध भूमिगत राहून लढणारा एक क्रांतिकारक फुलोला भेटतो, काही गुप्त पत्रकांचे वाटप करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवतो. सगळीकडे त्यावेळी संचारबंदी


साहित्य आणि विचार - ४४७