पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आमची १९९९ साली पहिली भेट झाली तेव्हा ते 'बिना अपार्टमेंट्स'मध्ये राहत होते व तिथे त्यांच्याबरोबर मी दोनतीनदा तरी जेवलो; डायनिंग टेबलाभोवतीच आमचे बोलणे व्हायचे. त्यांची ती सुमार अशा इमारतीतील सदनिका, घरातले साधे फर्निचर, त्यांचे कपडे, त्यांचे जेवण हे सर्वच 'कुलक' ह्या प्रतिमेशी अगदी विसंगत होते. त्यानंतरही पुढच्या सतरा वर्षांत त्यांची जीवनशैली जवळून बघता आली. उच्चपदी काम केलेल्या कुठल्याही सरकारी नोकरापेक्षा अथवा एखाद्या प्राध्यापकापेक्षा त्यांची राहणी अधिक आरामदायी होती असे मला तरी कधीच जाणवले नाही. 'बड्या बागाईतदारांचे प्रतिनिधी' वगैरे आरोप त्यांच्यावर करणे म्हणजे उघडउघड दुष्टपणा होता.

 जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन केले म्हणजे ते 'बड्या भांडवलदारांचे बगलबच्चे' होते हाही असाच एक बिनबुडाचा गैरसमज! वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट होती. सरकारच्या तथाकथित समाजवादी धोरणांचा सर्वाधिक फायदा भारतातील भांडवलदारवर्गाला होत होता. त्यांना मुळात खुली अर्थव्यवस्था व त्यातून येणारी स्पर्धा नकोच होती. लायसन्सपरमिट राज त्यांच्या पथ्यावरच पडणारे होते. एकदा एखादे उत्पादन करायचे लायसन्स मिळवले, की त्या मालाची परदेशाहून कधी आयात होणार नाही याची दक्षता घ्यायची, एवढेच त्यांचे काम होते. ते येन केन प्रकारेण जमवले, की आपले दय्यम प्रतीचे उत्पादन भारतात अवाच्या सवा किमतीला विकणे त्यांना सहजशक्य होते. कारण एकदा स्पर्धा निर्माणच होऊ दिली नाही, की सगळे सेलर्स मार्केटच होते! माणसे विकत घ्यायची कला या भांडवलदारांना अवगत होती; केवळ राजकारणीच नव्हे तर कामगारनेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी वगैरे सगळीच समाजातील सत्तास्थाने पैशाच्या जोरावर वश करता येत होती.

 चेतना गाला यांनी मुंबईला इंडियन मर्चेट्स चेंबरमध्ये एकदा जोशींचे मुक्त अर्थव्यवस्थेवर भाषण ठेवले होते. नवल म्हणजे त्यावेळी उपस्थित उद्योगपतींनी व त्यांच्या प्रतिनिधींनी जोशींना समर्थन देणे सोडाच, उलट खप विरोधच केला होता. बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याच्या डंकेल अहवालातील कलमावरून तर जोशींच्या भूमिकेला सर्वाधिक विरोध उद्योगपतींनी केला - विशेषतः औषध कंपन्यांनी. शेतकरी संघटनेला किंवा स्वतंत्र भारत पक्षाला कुठल्या बड्या भांडवलदाराने किंवा देशी-विदेशी फंडिंग एजन्सीने कधी मोठी देणगी दिल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही किंवा संघटनेच्या कुणा टीकाकारानेही तसे कुठे लिहिलेले नाही. आजकाल अगदी प्रादेशिक, राजकीय पक्षही शेकडो कोटींची माया जमवत असतात. हेच कॉर्पोरेट जग खरेतर अनेक तथाकथित पुरोगामी पक्षांना, व्यक्तींना व त्यांच्या संस्थांना मात्र वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भरीव आर्थिक मदत करत होते. आणि त्यांच्याकडून भक्कम फंडिंग घेऊनही काही माणसे कायम 'पुरोगामी' म्हणून मिरवत आली आणि ज्याने तसे फंडिंग कधीच घेतले नाही, त्याला मात्र त्यांनी 'भांडवलशाहीचा बगलबच्चा' ठरवून टाकले!


सांजपर्व - ४७७