पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत, किंवा न येईपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या मनाला ज्या सहस्त्र इंगळ्या डसतात त्याचे चित्र साहित्यात मला कुठेही दिसत नाही. मी शेतकरी जीवनाचे उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते जीवन, काय ती हिरवी हिरवी झाडे, काय ती स्वच्छ हवा, कसे झुळझुळ पाणी; शेतीवर असणे म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात असणे! असे म्हणण्याचा वाह्यातपणा मी केला नाही. शेती ही एक जीवनपद्धती आहे; इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये तिचे महत्त्व होते; पण पुढे जितकी माणसे शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील, तितका त्या समाजाचा विकास आहे.

(समाजसेवेची दुकानदारी नको! अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)}}
  जोशींच्या मते, दूरचित्रवाणीवर असंख्य मालिका अहोरात्र चालू असतात; पण त्यात शेतकरी जीवनाचे प्रामाणिक चित्रण कुठेच दिसत नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने दूरचित्रवाणीचा पडदा नव्याण्णव टक्के भरलेला आहे. पण याची कोणालाच खंत वाटत नाही; खुद्द शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही तशी खंत वाटत नाही. गावागावात तेही सगळे तेच रंगीबेरंगी स्वप्नरंजन जिभल्या चाटत बघत राहतात! ह्या भयानक विसंगतीविरुद्ध कोणीही बोलताना दिसत नाही. शहरी लोकांना ज्याप्रकारचे ग्रामीण जीवनाचे खोटे-खोटे चित्रण आवडते, तशाच प्रकारचे ग्रामीण जीवन हे तथाकथित ग्रामीण साहित्यिक रंगवत बसतात; केवळ स्वतःसाठी नाव मिळवण्यासाठी. शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष वेदनेशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. साहित्य आणि साहित्यिक यांच्यापासून जोशी दूर होत गेले ते अशा मतांमुळे.

 मी साहित्यिक नाही हे जवळाबाजार येथे १९९५ साली भरलेल्या चौथ्या परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण (शे.स. २१.१०.१९९६) सर्व मराठी साहित्यिकांनी अभ्यासावे असे आहे. पण एरव्ही साहित्य संमेलनाबद्दल भरपूर चर्चा करणाऱ्या वृत्तपत्रांनी व एकूणच साहित्यविश्वाने ह्या भाषणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महाविद्यालयातील विद्याथ्यांस पत्र ह्या त्यांच्या एका पत्ररूपी लेखाबद्दल दुसऱ्या प्रकरणात लिहिले आहे. गावातुन शहरात शिकायला आलेल्या असंख्य युवकांना त्या काळात या पत्राने भारावून टाकले होते. जोशींची लेखणी किती विलक्षण प्रभाव टाकू शकत असे याचे हा लेख म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.
 सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचा जोशींशी चांगला संबंध आला होता. फेब्रुवारी १९८४मध्ये परभणीला झालेल्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाला भालेराव गेले होते. तेथील केवळ भाषणेच त्यांना आवडली असे नव्हते; त्यांच्या साहित्यिक नजरेने इतरही अनेक आगळ्या गोष्टी टिपल्या होत्या. उदाहरणार्थ, एके ठिकाणी ते लिहितात,
 शेतकरी संघटनेने वेळोवेळी काढलेली पोस्टर्स काळजाचा ठाव घेणारी होती.

४३८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा