पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखावणारी होती. कुटुंबाच्या मालमत्तेत स्त्रियांना वाटा मिळायला हवा ह्यावर चर्चासत्रे अनेक झाली, परिसंवाद असंख्य भरवले गेले; पण प्रत्यक्षात सात-बाराच्या उताऱ्यावर स्त्रियांची नावे आली ती शेतकरी महिला आघाडीच्या कामामुळेच. शेतकरी आंदोलनाचे हे एक फलित, जवळपास पूर्णतः दुर्लक्षित राहिलेले, पण खूप महत्त्वाचे असे आहे.
 प्रस्थापित स्त्रीमुक्ती चळवळीशी मात्र जोशींचे कधीच फारसे जमले नाही. अशा स्त्रीमुक्तिवाद्यांवर जोशींनी जळजळीत टीका केली आहे. ते लिहितात,

जागोजागी स्त्री-संघर्ष समित्या उगवतात आणि स्त्री-साहाय्याची काही जुजबी कामे करीत राहतात. स्त्रीपुरुष संमिश्र समाजात आपल्या कर्तबगारीला पुरेसा वाव नाही अशी जाणीव झाली, की स्त्रिया महिला चळवळीकडे वळतात; मोठमोठ्या मान्यवर महिला संघटनांत लब्धप्रतिष्ठित स्त्रियांनी महत्त्वाची सारी पदे अडवलेली असतात. कोणत्याही कार्यक्रमात मिरवायला त्यांनाच मिळते. नाव त्यांचेच होते. त्यामुळे अशा संस्थांत नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना आत शिरायला फारसा वाव नसतो. तेव्हा, जी ती स्त्री एक नवी पाटी लावून आपली एक संस्था उभी करू पाहते.

स्त्रियांचा प्रश्न हा अनेक संस्थांत, विश्वविद्यालयांत अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या परिषदा भरवणे, परिसंवाद घडवून आणणे हे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोमाने चालू आहे. महिला कार्यकर्त्या राज्यपातळीवरील परिसंवादांत आधी मान्यता पावतात, मग हळूहळू राष्ट्रीय पातळीवर त्या परिसंवाद करू लागतात आणि शेवटची पायरी म्हणजे, वर्षातून दोनचार वेळा वेगवेगळ्या देशांत घडणाऱ्या परिसंवादातील जागाही भूषवू लागतात. महिला चळवळीतील कार्यकर्त्यांचे या दृष्टीने तीन संच बनतात : आगगाडी संच, विमान संच आणि जेट संच! या सगळ्यातून स्त्रीप्रश्नाविषयीची खरी कळकळ ओसरू लागली, ती एक 'करिअर' बनली.
वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली कर्तबगारी दाखविणाऱ्या स्त्रिया होत्या. कोणी वकील होत्या, कोणी डॉक्टर; कोणी लष्करात जात होत्या तर कोणी वैमानिक बनत होत्या; कोणी साहसाची कामे करीत होत्या तर कोणी कलाक्षेत्रात चमकत होत्या. त्यांनी आपल्या स्त्रीपणाचा काहीही आधार न घेता, मोठी कामगिरी करून दाखवली. साऱ्या स्त्रीजातीस ललामभूत असलेल्या या दुर्गा स्त्री-चळवळीपासून दूर राहिल्या आणि स्त्री-चळवळ वावदूक मुखंडींच्या हाती गेली.

(चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न, पृष्ठ १४०-५)


 मार्क्सवादात कामगार आणि मालक किंवा 'आहेरे' आणि 'नाहीरे' असे दोन परस्परविरोधी वर्ग मानले गेले, त्यांच्यात वर्गसंघर्ष (classwar) अटळ आहे असे मानले

किसानांच्या बाया आम्ही...३०७