पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चटणी-भाकऱ्या बांधून घेऊन चांदवडला हजर झाल्या होत्या. मोकळ्या माळरानावरच त्यांनी आपापली निवासव्यवस्था केली होती. तसे ते कडाक्याच्या थंडीचे दिवस. उघड्या माळरानावर तर त्याची तीव्रता अधिकच झोंबणारी. पण त्याची ह्या महिलांना काहीही तमा नव्हता. स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरुष मुक्ती हे अधिवेशनाचे घोषवाक्य होते.
 निझामाच्या राजवटीत रझाकारांविरुद्ध लढा देणाऱ्या आणि त्यासाठी घराबाहेर पडायचे धाडस दाखवणाऱ्या वीर महिला दगडाबाईंच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून नऊ तारखेला अधिवेशनाला सुरुवात झाली. रामचंद्रबापू पाटील स्वागताध्यक्ष होते. एकूण व्यावहारिक नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आपल्या स्वागतपर भाषणानंतर त्यांनी अधिवेशनाची सर्व सूत्रे महिला आघाडीच्या हाती सुपूर्द केली. शेतकरी संघटनेच्या कामात महिलांचा सहभाग आजवर कसकसा वाढत गेला, महिला आघाडीच्या कामाचे आजचे स्वरूप कसे आहे वगैरेची माहिती सुरुवातीलाच महिला आघाडी प्रमुख मंगला अहिरे यांनी दिली. दिवसभर वेगवेगळी चर्चासत्रे झाली. रोजगार हमी योजना, पाणीप्रश्न, शिक्षण, हुंडा, पोटगी, समान नागरी कायदा आणि समाजातील असुरक्षितता ह्या विषयांवर चर्चा झाल्या.
 दुसरा दिवस उजाडला. १० नोव्हेंबर हा शेतकरी हुतात्म्यांचा स्मरणदिन. त्यांच्या स्मृतीला वंदन करून अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अगदी सकाळीसकाळीच दीड हजार आदिवासी महिला एका मोर्च्याने मंडपात हजर झाल्या. आपल्या पारंपरिक पोशाखात. त्यांचे उत्साहाने स्वागत केले गेले. 'आदिवासी स्त्रिया या आमच्या बहिणी आहेत आणि त्यांना हिंदू कायद्याखाली वागवण्यात यावे' असा एक ठराव याच वेळी संमत केला गेला. बरोबर अकरा वाजता नाशिक जिल्ह्यातून आलेल्या ३०,००० महिला एका मोर्च्याने जवळच असलेल्या मंगरूळ फाट्यावर येऊन पोचल्या. रामचंद्रबापू पाटील आणि माधवराव मार यांनी तिथे जाऊन त्यांचे स्वागत केले. पुढे त्या खुल्या अधिवेशनात येऊन दाखल झाल्या.

 ठीक दोन वाजता खुले अधिवेशन सुरू झाले. समोर आता महिलांचा अथांग समुद्र जमला होता. संघटनेच्या प्रथेप्रमाणे मंचाची उभारणी अगदी साधी पण खूप कल्पक होती. एका बाजूला 'शेतकरी संघटना' असे मोठ्या अक्षरांत लिहिले होते, तर दुसऱ्या बाजूला एका शेतकरी मायेचे चित्र. तिच्या पाठीवर एक लहान मुलगी बसलेली, डोक्यावर जड अशी पाटी, हातात कापणी करायचे खुरपे. समोरच्या टोपलीवर 'आम्ही मरावं किती?' अशी अर्थपूर्ण ओळ लिहिलेली. अधिवेशनात कर्नाटक रयत संघाचे बसवराज तंबाखे, गेल ऑमवेट, विमलताई पाटील, सुमन बढे, मृणालिनी खैरनार वगैरेंची भाषणे झाली.
 नंतर सर्व उपस्थित स्त्रियांनी 'किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया' हे सानेगुरुजींचे गीत व 'डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती, आलं वरीस राबून, मी मरावं किती' हे नारायण सुर्वे यांचे गीत ही दोन्ही गीते मोठ्याने एकत्र म्हटली. तो एक अविस्मरणीय असा क्षण होता.

 सुर्वे स्वतः मार्क्सवादी म्हणून प्रसिद्ध व जोशींचा मार्क्सवादाला असलेला विरोध जगजाहीर. तरीही या प्रकाराने ते पुरते भारावून गेले होते. नंतर त्या कवितेविषयी लिहिलेल्या

२९०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा