पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाखाच्या कर्जाची; पण ती काहीच तगादा लावत नाही. उलट इतर सावकारांचीच कर्ज भागवण्याकरिता अंगावरचे दागिनेसुद्धा प्रसंगी उतरून देते. या मंगल सावकाराचं कर्ज फेडण्याचा विचार तुम्ही कधी करणार? या कर्जातून मुक्त होणं महत्त्वाचं आहे. हे काम अगदी निकडीचं आहे.
 'आपण घामाचं दाम मागतो, पण घरच्या लक्ष्मीच्या घामाची किंमत करत नाही. शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे असं म्हणतो, पण घरातल्या लक्ष्मीला गुलामासारखे वागवतो. अशा खोटेपणाला यश कसं लाभेल? घरच्या लक्ष्मीचा मान राखला नाही, तर बाहेरची लक्ष्मी घरात यायची कशी? आणि आली तरी टिकायची कशी?
लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम म्हणजे काय हे आता स्पष्ट होऊ लागलं असेल. घरच्या लक्ष्मीच्या कर्जातून मुक्त होण्याचा हा कार्यक्रम आहे. पण या एवढ्या कर्जातून मुक्त व्हायचं कसं?
 'देवाच्या देण्यातून आपण कसं मोकळं होतो? तोंडात घास टाकण्याआधी आपण त्याला नैवेद्य दाखवतो. म्हणतो, बाबा, हे सगळं तुझ्यामुळे आहे. झटकन देवाचं देणं फिटतं.
लक्ष्मीमुक्ती हा कार्यक्रम असा नैवेद्याचा आहे. शेतकरी त्याच्या लक्ष्मीला म्हणतो, 'बाई, माझ्या गरिबाच्या संसारात हळदीच्या पावलांनी आलीस. तुझी काहीच हौसमौज घरात झाली नाही. मी तुला वेडंवाकडं बोललो. काही वेळा हातही उगारला. तुझ्या सगळ्या कष्टांची आणि त्यागाची आज मी कृतज्ञतापूर्वक आठवण करतो आणि या एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याचा तुला नैवेद्य दाखवतो.'

 असंख्य सभांमधून जोशींनी ह्या आशयाचे हृदयस्पर्शी भाषण केले. सगळ्या उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. अनेक जण चक्क हुंदके देत रडायचे, घरी गेल्यावर अहमहमिकेने शेतकरी आपल्या पत्नीचे नाव आपल्या मालकीच्या जमिनीवर लावू लागले. ही एक मोठी क्रांतीच होती.
 लक्ष्मीमुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून ज्या गावातील किमान १०० जमीनधारक आपल्या घरच्या लक्ष्मीचे नाव जमिनीची मालकी प्रस्थापित करणाऱ्या सात-बाराच्या उताऱ्यावर स्वतःबरोबर लावतील, त्या गावाला स्वतः शरद जोशी भेट देतील असे जाहीर करण्यात आले. एखाद्या गावात १०० जमीनधारकच नसतील, तर मग त्या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी असे केले, तरी त्या गावांनाही जोशी भेट देणार असे ठरले. ही घटना २ ऑक्टोबर १९९०ची आहे. लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाची ही औपचारिक सुरुवात म्हणता येईल.

 त्यावेळी जोशींना असे वाटले होते, की आपल्याला फार तर पाचपंचवीस गावांमध्ये जावे लागेल; दिलेले वचन पुरे करणे फारसे अवघड जाणार नाही. मोठमोठ्या विद्वानांनी, पुढाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते, की हा कार्यक्रम अगदी अव्यवहार्य आहे, जमिनीच्या तुकड्यावरून शेतकरी भावाभावांत वैर माजते, डोकी फुटतात; शेतकरी बायकोचे नाव आपल्या बरोबरीने

किसानांच्या बाया आम्ही...२९९